तांबवे सोसायटी विकासाची परंपरा राखणार - सत्यजितसिंह पाटणकर


तांबवे सोसायटी विकासाची परंपरा राखणार - सत्यजितसिंह पाटणकर


पाटण (प्रतिनिधी) - तांबवे गावाला विकासाची गौरवशाली परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत, तांबवे गावातील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रगतशील विचारांच्या सत्ताधारी श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलला संधी दिली आहे. तांबवे सोसायटीचा एक आदर्श सोसायटी म्हणून सर्वत्र नावलौकिक आहे. येणाऱ्या काळात हाच नावलौकिक कायम ठेवून, लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात नुतन संचालक मंडळ अग्रसेर राहील यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे अश्वासन  पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिले. 


तांबवे वि.का.स. सेवा सोसायटीची पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या भैरवनाथ पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत घवघवीत यश मिळवले. या यशानंतर सर्व विजयी उमेदवार व स्थानिक पदाधिकारी यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करताना ते बोलत होते. 


 यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, पाटण सारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (दादा) यांनी सहकाराचे भक्कम जाळे निर्माण करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. गावागावांत असणाऱ्या सेवा सोसायट्यांना फार महत्व आहे. या सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकच आहेत. या सोसायट्या अधिक सक्षम केल्या तर शेतकऱ्यांची व गावाचीही प्रगती होणार आहे. सध्या या सोसायट्या केवळ पिक कर्ज, दिर्घ व मध्यम मुदत कर्जे अशी जुजबी सेवा देतात. अपवादात्मक सोसायट्यांचे खतविक्री, रेशनिंग दुकान, पेट्रोल पंप, असे इतरही व्यवसाय आहेत. मात्र सर्वच सोसायट्यांचे अशा माध्यमातील उत्पन्न वाढले पाहिजे. सोसायट्यांनी सध्याच्या कर्जप्रकरणांसह गावातील तरुण उद्योजक, छोटे-मोठे व्यवसायिक यांना कर्ज देण्यास सुरवात केली पाहीजे. जेणेकरून गावच्या प्रगतीला, गावच्या तरूणांच्या प्रगतीला हातभार लागणार आहे. गावातील या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना इतर बँका कर्ज देत नाहीत, त्यांना कर्ज देऊन सक्षम करण्याचे काम सोसायट्या करू शकतात. यासह विविध सामाजिक उपक्रम सोसायटीच्या माध्यमातून राबवण्याचा मानस या नुतन संचालक मंडळाने ठेवून सर्वांना सोबत घेऊन प्रगतीपथावर वाटचाल करावी यासाठी आम्हीं सर्वतोपरी सहकार्य करु असेही अश्र्वासन त्यांनी शेवटी बोलताना दिले. 


सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते विजयी उमेदवार प्रकाश चव्हाण, आनंदराव ताटे, धोंडीराम पवार, निवास पवार, संभाजी पवार, जालिंदर पाटील, दादासाहेब पाटील, संदीप पाटील, इंदूताई पाटील, मंगल पाटील, सुरेश कारंडे, मुसा मुल्ला, मनोहर काटवटे यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी निवासराव पाटील, सरपंच जावेद मुल्ला, माजी सरपंच धनंजय ताटे, आबासो पवार, माजी पंचायत समिती सदस्य पी. एल. माने, विलासराव पाटील, शशिकांत पाटील, शंकरराव पाटील, दत्तात्रय भोसले, मानसिंग मोगरे, अनिल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.