कराड तालुक्यातील 183 गावातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार


कराड तालुक्यातील 183 गावातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार


कराड - महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. कराड तालुक्यात १८३ गावातील यादी तयार असून या गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.बहुतांश शेतकऱ्यांना सेवा सोसायट्यांनी कर्ज दिले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज वितरित करण्यात आले आहे. कराड तालुक्यात ८ हजार ४६१ शेतकरी कर्जदार आहेत.यापैकी ४१४१ शेतकऱ्यांना सेवा सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कर्ज वितरित केले. या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.


दरम्यान आज अखेर २५४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू असून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक, विकास सेवा सोसायटी, महा-ई-सेवा केंद्र याठिकाणी राहिलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे असे असे आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होईल कर्जमुक्तीचा लाभ होणार आहे. यासाठी तहसील कार्यालयाच्यावतीने प्रयत्न केला जात आहे.


कर्जदार शेतकऱ्यांची यादी कराड तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेचा लाभ होणार आहे अशा लाभार्थी शेतकऱ्यांना राज्य शासनाने कर्जमाफी दिली आहे. संबंधित सेवा सोसायटी, जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँकांकडून ज्यांनी कर्ज घेतले आहे अशा कर्जदार शेतकऱ्यांची अध्यावत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ८ हजार ४६१ कराड तालुक्यात कर्जदार शेतकरी असून ६ हजार ७५९ कर्जदार शेतकऱ्यांची नावे यादीत आली आहेत. सुमारे वीस कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना वितरीत केलेले आहे. कर्जमुक्ती होणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कर्जाची मिळणारी रक्कम ही कर्ज खात्यात जमा होणार आहे.


सातारा जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये तालुका निहाय गावांची संख्या अशी, सातारा 170, कराड 183, पाटण 234, जावली 117, महाबळेश्वर 82, वाई 102, खंडाळा 66, फलटण 123, माण 98, खटाव 139, कोरेगाव 123 असे मिळून 1 हजार 437 गावातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होत आहे.


शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावेकराड तालुक्यातील ज्या गावातील शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेली आहेत. त्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक, महा-ई-सेवा केंद्र येथे शेतकऱ्यांनी आधारप्रमाणीकरण करावे असे आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले आहे.