खा.श्रीनिवास पाटील यांचेकडून 25 लाखाचा निधी...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय ; आरोग्य साहित्य खरेदीसाठी मदत


खा.श्रीनिवास पाटील यांचेकडून 25 लाखाचा निधी...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय ; आरोग्य साहित्य खरेदीसाठी मदत


कराड :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्याकरिता खा. श्रीनिवास पाटील यांनी 25 लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे. खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मदत होणार आहे. 


 कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण देश लॉकडाऊन होत असल्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन 21 दिवस राहणार आहे. तर राज्य सरकारनेही कडक निर्बंध आणले आहेत. सातारा जिल्ह्यात कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून कोरोना व्हायरस विरोधात संपूर्ण जिल्हावासीय लढा देत आहेत. जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर  असून कोरोना नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे यंत्रणेवरती ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी आणि प्रशासनालाही निगडीत सोयीसुविधा उपलब्‍ध व्हाव्यात यासाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून 25 लाखाचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यावा अशी सूचना केली आहे.


खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोल गडीकर यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानुसार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये कोरोना बाबत उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य, टेस्टिंग किट, डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांच्यासाठी लागणारे सुरक्षा मास्क, कपडे, थर्मल स्कॅनर आदी साहित्य खरेदी करण्यासाठी हा निधी वर्ग करण्यासाठी मान्यता कळवली आहे. दरम्यान प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊन आपले आरोग्य जपावे असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे.