पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यावर नेणार - गृहमंत्री अनिल देशमुख


पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण 30 टक्क्यावर नेणार - गृहमंत्री अनिल देशमुख


मुंबई - राज्यातील पोलीस दलामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण सध्याच्या 15 टक्क्याहून 30 टक्क्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील राहील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा पदयात्रा (मार्च) काढण्यात आली.


मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शाळांच्या विद्यार्थीनी, आरएसपीच्या विद्यार्थीनी, विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले. एनसीपीए येथे या पदयात्रेच्या शुभारंभप्रसंगी गृहमंत्री बोलत होते. याप्रसंगी मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह, गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या पत्नी श्रीमती आरती देशमुख यांच्यासह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


 प्रारंभी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन श्री. देशमुख म्हणाले, आज महिलांच्या गौरवाचा दिवस आहे. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या त्या सक्षमतेने सांभाळत आहेत. घर आणि कुटुंब सांभाळून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला आदर्शवत काम करत आहेत.


 राज्याच्या पोलीस दलात सुमारे सव्वादोन लाख अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे 28 हजार म्हणजेच 15 टक्क्याच्या आसपास महिला आहेत. सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्या उत्कृष्ट काम बजावत आहेत. महिला पोलिसांचे प्रमाणे वाढवून 30 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील.


 ते पुढे म्हणाले, समाजात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. राज्य शासन या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून अशा दुर्दैवी घटनांना पायबंद घालण्यासाठी नवीन कायदा करत आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलिसांकडून संवेदनशीलरित्या हाताळली जातात. मात्र तपासामध्ये अधिक गतीमानता तसेच लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी विशेष तरतूद या कायद्यात करण्यात येणार आहे.


या पदयात्रेत मरीन ड्राईव्हच्या पदपथावरुन स्वत: गृहमंत्री श्री. देशमुख हे सपत्नीक सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह सहभागी झाली. मरीन ड्राईव्हला फेरफटका मारण्यासाठी आलेले मुंबईकर तसेच पर्यटकांनी कौतुकाने रॅलीची मोबाईल कॅमेऱ्यातून छायाचित्रे काढली. कौतुकाने गृहमंत्र्यांसोबत सेल्फी काढण्याची काहींची इच्छाही यावेळी पूर्ण झाली. पदयात्रेचा समारोप सुंदरमहल जंक्शन जवळ झाला.


पोलीस बँडची धून, घोडेस्वार (माऊंटेड) पोलीसांचा डौल यामुळे ही पदयात्रा प्रेक्षणीय ठरली. शेवटी गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थीनी, आरएसपीचे विद्यार्थी- विद्यार्थिनींकडे जाऊन आस्थेने विचारपूस करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाच्या आयोजनात सहपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, संतोष रस्तोगी, मधुकर पांडे, राजवर्धन, अतिरिक्त पोलीस आयुक्त निशीत मिश्रा, एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त एन. अंबिका, सुनिता साळुंखे, संग्रामसिंह निशानदार, रश्मी करंदीकर आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये मुंबई पोलीस दलातील महिला सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.