साखरेबरोबरच ऊसापासून इतर घटकांचे उत्पन्न घ्यावे – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील


साखरेबरोबरच ऊसापासून इतर घटकांचे उत्पन्न घ्यावे – सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील


कराड- राज्यात साखरेची टंचाई निर्माण झाल्याशिवाय साखरेचे दर वाढणार नाही. किंबहूना साखरेला चांगला दर मिळणार नाही. हे लक्षात घेऊन ऊसापासून साखरेबरोबरच अन्य घटकांचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी आज विधानपरिषदेत केले.


अवकाळी पाऊस आणि महापुरामुळे ऊसाचे उत्पादन घटले आहे. परिणामी साखरेच्या उत्पादनात घट झाल्याने याचा फटका थेट साखर उद्योगाला बसला आहे. त्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती बिकट होताना पाहायला मिळतेय. यावर राज्य शासनाने ऊसाचा साखर उतार कमी झाल्याने राज्यातील साखर कारखान्यांना अनुदान देऊन कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत तसेच साखर कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची रक्कम संबधित बँकात भरण्याची जबाबदारी शासनाने घेतली असून तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात शेकापचे आ. जयंत पाटील यांनी आज विधान परिषद प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.


यावर राज्याचे सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना म्हणाले की, राज्यात यंदा आतापर्यंत ४९५ लाख टन ऊसाचा गाळप झालेला आहे. त्यातून ५१८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे यावर्षी साखरेच उत्पादक कमी असून साखरेचा उतारा ११ पूर्णांक २० शतांश टक्के राहील असा अंदाज आहे. याला कारण अर्थात, सांगली, कोल्हापूर, सातारा अशा काही भागात महापूरामुळे साखर उत्पादनाचे मोठे नुकसान झाले. यासगळ्याचा आढावा घेताना संबधित सर्व घटकांना सोबत घेऊन येत्या मंगळवारी सभापती महोदयांच्या दालनामध्ये बैठक घेऊन सकारात्म निर्णय घेण्याचे आश्वासन सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिले.