जीवनावश्यक मालवाहतुकीस परवाना देण्याची सुविधा उपलब्ध

जीवनावश्यक मालवाहतुकीस परवाना देण्याची सुविधा उपलब्ध


सातारा : कोरोना संसर्ग संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक, महत्त्वाच्या व आवश्यक मालवाहतूकीस परवाना देण्याची सुविधा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. परिवहन कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी वाहतुकदारांनी सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये dyrto.११-mh@gov.in व कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये mh५०drtokarad@gmail.com या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवावा. अर्जाची शहानिशा करुन अशा अर्जदारांना परवान्याच्या स्कॅन कॉपी ई-मेलद्वारे पाठविण्यात येतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत  यांनी कळविले आहे.


 मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 25.03.2020 अन्वये सुधारित अधिसूचना पारित केली आहे. या अधिसूचनेतील अनुक्रमांक (9) अन्वये सर्व वाहतुक सेवा (हवाई/लोहमार्ग/रस्ते) स्थगित केल्या आहेत. तथापि त्यामधून (अ) जीवनावश्यक, महत्त्वाच्या व आवश्यक मालवाहतूकीस व (ब) अग्निशमन, कायदा-सुव्यवस्था व आणीबाणीच्या सेवा या वाहतुकीस सूट जाहीर केलेली आहे. सदर निर्बंध माणसांच्या हालचालीवर असून अत्यावश्यक व महत्त्वाच्या मालवाहतूकीवर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अधिसूचनेतील अ. क्र. (22) नुसार अत्यावश्यक सेवा पुरविणा-या आस्थापनांनी अशा मालवाहतुक करणा-या वाहनांवर तसेच त्यांच्या कर्मचा-यांची ने-आण करणा-या वाहनांवर स्वत: स्टीकर्स बसवावेत. सदर स्टीकरवर वाहतुकीच्या उद्देशाचा मजकूर स्पष्ट दिसेल अशा पध्दतीने प्रदर्शित करावा. जेणेकरुन अंमलबजावणी यंत्रणेच्या सहज निदर्शनास येईल.