आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 74 कोटी 96 लाख निधी


आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 74 कोटी 96 लाख निधी


कराड -  सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेतून तसेच अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल 74 कोटी 96 लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, युवानेते इंद्रजित चव्हाण आदी नेते उपस्थित होते.  कराड दक्षिणच्या विविध विकासकामांसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या संबंधित मंत्र्यांना पत्राद्वारे निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. त्यानूसार हा निधी मंजूर झाला आहे.


आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, मतदारसंघात चौफेर विकास करण्यावर मी कायमच भर दिला आहे. मुख्यमंत्री असताना कराड दक्षिणसाठी 1800 कोटी इतका भरघोस निधी आणता आला. सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, संपूर्ण राज्याचा विचार करून समतोल विकास साधण्यावर या सरकारचा भर आहे.


आ. चव्हाण यांनी मागणी केल्यानुसार नुकत्याच मंजूर झालेल्या निधीमध्ये कराड दक्षिणमधील डोंगरी विभाग, वांग खोरे, हायवेलगतचा भाग, कृष्णाकाठ यासह मलकापूर विभागात निधी देऊन समतोल साधला आहे. या निधीमधून 51 गावांमधील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासनिधींच्या माध्यमातून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील गावांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तताच केली आहे. 


मंजूर झालेल्या निधीमध्ये ग्रामीण विकास योजने अंतर्गत 12 कोटी 51 लाख रु, तसेच पाचवडेश्वर ते कोडोली कृष्णा पुलावरील पुलाच्या बांधकामासाठी 45 कोटी रु, जुन्या कोयना पुलाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी 1 कोटी 80 लाख रु, कराड-मलकापूर-ढेबेवाडी विंग येथे चौपदरी रस्त्यासाठी मोरीचे बांधकामासाठी 20 लाख रु, जुन्या कोयना पुलाच्या दुरुस्तीची उर्वरित कामासाठी 1 कोटी 60 लाख रु, कराड-मलकापूर-ढेबेवाडी चौपदरी रस्ता व फुटपाथ मध्ये रेलिंग कामासाठी व सुशोभीकरणासाठी 1 कोटी 60 लाख रु, रेठरे पुलाच्या दुरुस्तीसाठी 6 कोटी रु, उंडाळे ते पाटीलवाडी रस्ता साठी 3 कोटी रु, शेळकेवाडी ते पाटीलवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरणासाठी 2 कोटी 50 लाख रु, कृष्णा कालव्यावर शेरे गावाजवळील लहान पुलाचे बांधकामासाठी 75 लाख रु असे एकूण 74 कोटी 96 लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे.