कोयना धरणात 75.70 टीएमसी पाणीसाठा शिल्लक....तीन महिन्यांसाठी 24.44 टीएमसी पाण्यावर वीजनिर्मिती होणार
कराड - कोयना धरणातील पाण्यामुळे सिंचनाचा आणि वीजनिर्मितीचा प्रश्न निकाली निघतो. कोयनानगर (ता.पाटण) येथील कोयना धरणाचा तांत्रिक नऊ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर येणाऱ्या उन्हाळ्याच्या उर्वरित तीन महिन्यांसाठी धरणात 75.70 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे उर्वरित तांत्रिक वर्षासह आगामी वर्षारंभाचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. कोयना धरणाकडे महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून पाहिले जाते.
शिल्लक राहिलेल्या पाणी साठ्यातून सिंचनाला पाणी देऊन वीजनिर्मिती होऊ शकते.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वीजनिर्मितीसाठी जादा पाणीवापर होऊनही जादा शिल्लक पाणीसाठा ही जमेची बाजू आहे. कोयना धरणाचा तांत्रिक कालावधी १ जून ते 31 मे असा असतो. फेब्रुवारीअखेर या कालावधीपैकी नऊ महिने संपले आहेत. या कालावधीत येथे उपलब्ध पाणीसाठ्यापैकी सिंचनासाठी 9.25 टीएमसी तर पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 43.06 टीएमसी पाणी वापर झाला आहे. दरवर्षी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. यापैकी आत्तापर्यंत 43.06 टीएमसी पाणी वापर झाल्याने येणाऱ्या तीन महिन्यांसाठी 24.44 टीएमसी पाण्यावर येथे अखंडित वीजनिर्मिती होऊ शकते. दरम्यान उन्हाळ्याच्या दिवसातही कोयना धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
गेल्या काही वर्षांत सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी व गरज लक्षात घेता, मे महिन्याअखेर सरासरी 36 टीएमसी पाण्याची गरज भासते. आत्तापर्यंत सिंचनासाठी केवळ 9.25 टीएमसी इतकाच पाणीवापर झाल्याने आगामी काळात यापैकी 26.34 टीएमसी पाण्याची गरज भागविताना कोणतीही अडचण येणार नाही. गतवर्षी आत्तापर्यंत सिंचनासाठी तब्बल 17.69 टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. यावर्षी तो तुलनात्मक बराचसा कमी होऊन अवघा 9.25 टीएमसी इतकाच झाला आहे. ही जमेची बाजू म्हणावी लागेल.
20 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहू शकतो
सध्याच्या उपलब्ध 75.70 टीएमसीचा विचार लक्षात घेता आगामी काळात सिंचनासाठी 26.75, पश्चिमेकडील वीजनिर्मितीचा आरक्षीत कोठा 24.44 व मृतसाठा 5 अशा एकूण 56.19 टीएमसीचा वापर झाला तरी १ जूनपासून सुरू होणार्या नव्या वर्षारंभाला येथे जवळपास 20 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहू शकतो.