स्मिता राजापूरकर, वासंती झिमरे यांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव होणार
कराड - जागतिक महिला दिनाच्या औचित्याने शिक्षण मंडळातर्फे ७ मार्च रोजी महिला महाविद्यालय येथे "आदर्श माता पुरस्कार" वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभास लेखिका व चित्रकार उमा कुलकर्णी (पुणे) यांची प्रमुख उपस्थिती आहे. याप्रसंगी "स्त्री शक्ती" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, सेक्रेटरी शेखर देशपांडे यांनी सांगितली.
सुभाष वाडीलाल शहा यांच्या सौजन्याने त्यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबेन वडिलाल शहा यांच्या स्मरणार्थ "आदर्श माता पुरस्कार" प्रदान करण्यात येणार आहे. स्मिता सुरेश राजापूरकर (कराड), श्रीमती वासंती शरद झिमरे (कराड) यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या दोन्ही मातांनी आपल्या मुलांना धैर्य देऊन जीवनामध्ये यशस्वी केले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यास शिकवले. त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. असे सुभाष वाडीलाल शहा यांनी सांगितले.