मोरगिरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना विजबिला अभावी बंद पडण्याचा मार्गावर.....नागरिकांचा अन्नत्याग उपोषणाचा इशारा    


मोरगिरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना विजबिला अभावी बंद पडण्याचा मार्गावर.....नागरिकांचा अन्नत्याग उपोषणाचा इशारा    

 

मोरगिरी -   प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे १२ लाख रुपये विजबिल थकित गेल्याने विजबिला अभावी नळपाणी पुरवठा योजना बंद पडण्याचा मार्गावर असून ३१ मार्च अखेर मोरगिरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या मंडळाने पाच गावातून जमा केलेल्या पाणीपट्टीच्या रक्कमेतून थकित विजबिल भरावे अन्यथा मोरगिरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना बचाव क्रुती समितीच्या मोरगिरी, किल्ले मोरगिरी, झाकडे, गुंजाळी, मानगाव या पाच गावातील नागरिकांनी अन्नत्याग उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे पाटण तहसीलदार यांना दिला आहे. 

 

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, शेतकरी संघटनेचे रवींद्र मिसाळ, नितीन सुतार, सखाराम सपकाळ, ज्ञानदेव मिसाळ यांच्यासह मोरगिरी, किल्ले मोरगिरी, झाकडे, गुंजाळी, मानगाव या पाच गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

मोरगिरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची पाणीपट्टी पाच गावातील गावकऱ्यांनी संबंधित मोरगिरी प्रादेशिक नळ योजनेच्या मंडळाकडे भरून देखील १२ लाख रुपये विज बिल थकीत गेल्याने विजवीतरण कंपनीने थकीत वीजबिल भरण्याचा तगादा गावकऱ्यांच्याकडे लावला आहे. सदरचे थकित विजबिल न भरल्यास मोरगिरी प्रादेशिक नळ पाणी पुरवठ्याचे विज कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा विज मंडळाने दिला आहे. या योजनच्या विजबिला संदर्भात पाच गावातील नागरिकांना वेठीस न धरता शासनाने संबंधित प्रादेशिक नळपाणी पुरवठ्याच्या मंडळाकडून ३१ मार्च अखेर थकित विजबिल भरून घ्यावे. व विजबिल थकित जाण्याची कारणे शोधून संबधितावर कारवाई करावी. अन्यथा मोरगिरी, किल्ले मोरगिरी, झाकडे, गुंजाळी, मानगाव या पाच गावातील नागरिकांकडून बेमुदत अन्नत्याग उपोषण करावे लागेल असा इशारा मोरगिरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना बचाव क्रुती समितीने पाटण तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

 

 यावेळी बोलताना विक्रमबाबा पाटणकर म्हणाले मोरगिरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना वीजबिल अभावी बंदपडल्यास याचा फटका मोरगिरी, किल्ले मोरगिरी, झाकडे, गुंजाळी, मानगाव या पाच गावांना बसणार असून नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागणार आहे. मोरगिरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या विद्यमान मंडळाने पाच गावातील गावकऱ्यांच्या कडून पाणीपट्टी स्वरूपात मंडळाकडे विजबिल भरून घेतले आहे. संबधित मंडळाने मात्र जमा झालेली पाणीपट्टी ची रक्कम विजमंडळाकडे भरलेली नाही अस गावकऱ्यांचे मत आहे. म्हणून या योजनेचे १२ लाख रुपये विजबिल थकित गेले आहे. ऐन उन्हाळ्यात विजबिल अभावी मोरगिरी प्रादेशिक पाणीपुरवठा बंद पडल्यास याचा फटका पाच गावातील नागरिकांना बसणार असुन पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. यासाठी शासनाने नागरिकांच्या भावनांचा आदर करून संबंधित मंडळाकडून ३१ मार्च अखेर विजबिल वसूल करावे व मोरगिरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद पाडण्यापासून रोखावी. अन्यथा पाच गावातील नागरिकांना बेमुदत उपोषणाला बसावे लागेल असे सांगितले. तसा इशाराही मोरगिरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना बचाव क्रुती समिती कडून निवेदनाद्वारे पाटण तहसीलदार यांच्यासह ग्रामविकास विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी सातारा, ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभाग पाटण यांना देण्यात आले आहे.