ब्लॅकस्टोन कंपनीने राज्यात जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री


ब्लॅकस्टोन कंपनीने राज्यात जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री


मुंबई, : राज्यशासन जनतेच्या हितासाठी काम करीत आहे. त्यामुळे जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ब्लॅकस्टोन कंपनीचे राज्यशासन स्वागत करीत असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


वित्तीय सेवा आणि गुंतवणूक क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित ब्लॅकस्टोन कंपनीचे अध्यक्ष स्टीफन श्वार्झमन यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची भेट घेऊन कंपनी राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. जनतेसाठी अत्यंत सकारात्मक पद्धतीने आणि लवचिकतेने निर्णय घेत असलेल्या सरकारचा आपण प्रथमच अनुभव घेत असून तो प्रभावित करणारा असल्याचे ते म्हणाले.


यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, संबंधित सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी अत्यंत योग्य ठिकाण असून राज्यात उद्योग क्षेत्राबरोबरच गृहनिर्माण, पर्यटन, शेती अशा विविध क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठा वाव आहे. उद्योग क्षेत्रात आता शासनाबरोबर खाजगी गुंतवणूकदारांनाही सहभागी करून घेतले जात आहे. मुंबईसारख्या शहरात कामाठीपुरा, धारावी, बीडीडी चाळी अशा भागांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. पर्यटन क्षेत्रातही विकासाची मोठी संधी असून जागतिक स्तरावर महत्वाच्या असणाऱ्या आणखी कोणत्या बाबी आहेत, ज्यावर राज्यशासन नागरिकांसाठी काम करू शकेल याचाही अभ्यास करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ज्या क्षेत्रात ब्लॅकस्टोन कंपनी गुंतवणूक करण्यास इच्छुक असेल त्या विभागांच्या सचिवांनी कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत सविस्तर चर्चा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.