साहेब एसेही पैदल जायेंगे तो पाहूच जायेगे"...छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत गरीब रयतेचे हाल नकोत


"साहेब एसेही पैदल जायेंगे तो पाहूच जायेगे"...छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत गरीब रयतेचे हाल नकोत


कराड - रोजीरोटी मिळावी यासाठी परराज्यातून कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक जण येऊन वास्तव करीत आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे करायचे काय ? असा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक जण गावाकडे निघाले आहेत. रेल्वे, बस, प्रवासी वाहतूक, खाजगी वाहतूक सर्व बंद असल्यामुळे पायी जाण्याचा निर्णय घेऊन परप्रांतातील लोक आता पायी गावाकडे निघाले आहेत.


शेकडो किलोमीटर पायपीट करत आपल्या घरी मध्यप्रदेश-बिहार भागांत मजूर मजूर निघालेले आहेत हे विदारक चित्र डोळ्यात पाणी आणणारे आहे.आज मध्यप्रदेशकडे निघालेल्या या लोकांना मुद्दाम थांबवून त्यांना अन्नाची पाकिटे केदार डोईफोडे यांनी दिली. केदार डोईफोडे यांनी या लोकांशी चर्चा केल्यावर समजलं की या सर्वांच्या मनात एक भिती बसली आहे.


गांधीनगर(कोल्हापूर) येथून शनिवारी चालण्यासाठी सुरुवात केलेली आज दुपारी कराड येथे पोचले. सोबत खिश्यात दोन हजार रुपये आणि थोडे कपडे-पाण्याच्या बाटल्या आणि अगदी तोकड्या वस्तुनिशी आपले राहण्याचे ठिकाण यांनी सोडले आणि कुठे निघाले तर मध्यप्रदेश ६०० किमी दूर अंतरावर.


"साहेब एसेही पैदल जायेंगे तो पाहूच जायेगे" हे त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर हृदय पिळवटून जाते. लोकं कोरोनामुळे मरतील का ? ठाऊक नाहीं, पण चालून चालून यांचे काय होईल. हा प्रश्न मात्र सतावतो आहे. याना अन्न-पाणी मिळेल का ? हा विचार केला तर अंगावर रोमांच उभा राहतो.या अभूतपूर्व परिस्थितीचे गांभिर्य येईस्तोवर खूप कांहीं आपल्यातून वजा झाले असेल.


शेकडो लोकं रोज कराडच्या हायवेवर चालत घरी निघाली आहेत.सातारा जिल्ह्यातील तमाम प्रशासकीय अधिकारी बंधूनी काहितरी करा पण यांना थांबवा.आपल्या जिल्ह्यात लोकांचे असे हाल व्हायला नकोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत गरीब रयतेचे असे हाल व्हायला नकोत अशी भूमिका केदार डोईफोडे यांनी व्यक्त केले आहे.