कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत मुख्य सचिवांकडून आढावा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद

कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत मुख्य सचिवांकडून आढावा


जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद


मुंबई, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव अजोय महेता यांनी आज  सर्व विभागीय आयुक्त्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. कोरोना संदर्भात नागरिकांनी आवश्यक ती घ्यावयाची खबरदारी व त्यासंदर्भात करावयाची कार्यवाही  आणि उपाययोजनांबाबतचा आढावा घेण्यात आला. 


सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता चीनसह 12 देशातील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांचा 14 दिवसांपर्यंत पाठपुरावा करण्यात येतो. त्यातील एखाद्याला सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात दाखल करुन नमूने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले जातात. त्यानंतर नमुना निगेटीव्ह आल्यास त्या प्रवाशाला डिस्चार्ज दिला जातो, असे त्यांनी सांगितले.


राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथील विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी होत असून आवश्कता असल्यास अधिकचे मनुष्यबळ तेथे पुरविण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी महानगरपालिका व संबंधीत विभागांना दिले.  नागरिकांनी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा, नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, विशिष्ट अंतरावरुनच इतरांशी संवाद साधावा, खोकतांना अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. अशा सूचना मोठ्या प्रमाणावर प्रसारित कराव्यात, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण न पसरता खबरदारी घेण्यासाठी या सूचना उपयुक्त ठरतील याकडे त्यांनी लक्ष वेधले.


 जिल्हा रुग्णालयांमध्ये विलगीकरणासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आले असून त्या ठिकाणी पुरेशा साधन सामग्री उपलब्ध असल्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. ज्या जिल्ह्यांमध्ये बंदरे आहेत तेथे परदेशातून येणाऱ्या जहाजांवरील प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.


राज्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, बस, रेल्वे स्थानके, आठवडी बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याबाबत व कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी दक्ष राहण्याचे श्री.मेहता यांनी सांगितले. सामुहिक समारंभ, जत्रा, यात्रा यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येवू नये, असे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात यावे, अशी सूचना मुख्य सचिव यांनी केली. याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, विविध धर्माचे प्रमुख प्रतिनिधी इत्यादींचे सहकार्य घेण्याचे सूचित केले.


मंत्रालयात यावेळी झालेल्या आढावा बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे आदी उपस्थित होते.


Popular posts
"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली
Image
अशासकीय पदावरील नियुक्त्या रद्द ......महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, राज्यस्तरीय लेखा समिती, राज्य कृषि मूल्य आयोग
Image
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार ....लहुजी शक्तीसेना कराड शहराध्यक्षपदी सुरज घोलप यांची निवड
Image
"काँग्रेस"ला गतवैभव प्राप्तसाठी पृथ्वीराजबाबा - विलासकाका यांच्यात सकारात्मक चर्चा : राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील
Image
विशेष मुलाखत : पुणे आयुक्त दीपक म्हैसेकर सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात करता येईल...
Image