सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 


सेवा सोसायटीनी उद्योगाला कर्ज दिले तर प्रत्येक गाव सक्षम होईल 


कराड तालुक्यात असणाऱ्या गावागावांत सेवा सोसायट्यांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. कारण या संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत व सहकार्य मिळत असते. यामुळे सेवा सोसायट्यांना ग्रामीण भागात महत्त्व आहे. सहकाराचे जाळे संपूर्ण कराड तालुक्यात विणले गेले आहे. सहकाराची पहिली पायरी हे सेवा सोसायट्या आहेत. यानंतर दूध संघ, कुक्कुटपालन, नागरी सहकारी बँक, नागरी सहकारी पतसंस्था, सहकारी साखर कारखाना, सहकारी तत्त्वावर बाजार, सहकारी पाणीपुरवठा संस्था अशा सहकाराला पूरक संस्था आहेत. वास्तविक पाहता कराड तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला तो सहकार्यामुळेच. कराड तालुका हा सुजलाम-सुफलाम तालुका आहे. कराड तालुक्यामध्ये सहकार खोलवर रुजला आहे. सहकाराच्या माध्यमातूनच कराड तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला आहे, हे सर्व मान्य करतात.


गतकाळामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराचा पाया रोवला आणि ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी कराड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था निर्माण केल्या आहेत. त्यांनी उभ्या केलेल्या सहकारी संस्था पाहिल्यानंतर कराड तालुक्याचा विकास कशा पद्धतीने झाला ? आणि या नेत्यांनी यासाठी कसे योगदान दिले, हे दृष्टीपथात येते. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचा विकास करायचा असेल, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता द्यायची असेल, तर सहकार शिवाय पर्याय नाही. हे ओळखूनच कराड तालुक्यात सहकारी संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. कराड तालुका आकाराने मोठा आहे. कराड तालुक्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामुळे प्रशासनावर नेहमीच कामाचा ताण असला तरी सर्वसामान्य लोकांची कामे करताना प्रशासकीय पातळीवर अधिकारी सकारात्मक काम करतात. कारण सहकाराचे माध्यमातून तालुक्याचा विकास झाला आहे. यामुळे येणाऱ्या प्रत्येकाचे प्रश्न, समस्या सोडवणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून अधिकारी काम करीत असतात.


गावातील सेवा सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकच आहेत. या सोसायट्या अधिक सक्षम आहेत. काही सोसायट्या जेमतेम असल्यामुळे त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची व गावाच्या प्रगतीसाठी सेवा सोसायटी यांचे योगदान आहे. हे विसरता येणार नाही. सध्या या सोसायट्या केवळ पिक कर्ज, दिर्घ व मध्यम मुदत कर्जे अशा सेवा देत आहेत. सेवा सोसायट्या देत असलेल्या सेवा या सध्यातरी जुजबी आहेत. अपवादात्मक सोसायट्यांचे खतविक्री, रेशनिंग दुकान, पेट्रोल पंप, असे इतरही व्यवसाय आहेत. मात्र सर्वच सोसायट्यांचे अशा माध्यमातील उत्पन्न वाढले पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक सेवा सोसायटी यांच्याकडे अनेक बदल करता येण्याजोगे आहे, ते करणे आवश्यक आहेत.


कराड तालुक्यात एकूण 140 सेवा सोसायट्या आहेत. सोसायट्यांनी सध्याच्या कर्जप्रकरणांसह गावातील तरुण उद्योजक, छोटे-मोठे व्यवसायिक यांना कर्ज देण्यास सुरवात केली पाहीजे. जेणेकरून गावच्या प्रगतीला, गावच्या तरूणांच्या प्रगतीला हातभार लागेल. गावातील या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना इतर बँका कर्ज देत नाहीत, त्यांना कर्ज देऊन सक्षम करण्याचे काम सोसायट्या करू शकतात. यासह विविध सामाजिक उपक्रम सोसायटीच्या माध्यमातून राबवण्याचा मानस सेवा सोसायट्यांनी ठेवला तर नक्कीच ग्रामीण भागातील प्रत्येक गाव सक्षम होईल. प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायत आपल्या स्तरावर काम करीत असताना सेवा सोसायटी शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. कराड तालुक्यातील बहुतांश शेतकरी बागायतदार आहेत. सहकारी पाणीपुरवठा व सहकारी साखर कारखान्याच्यावतीने प्रत्येक गावांमध्ये पाणी पोचले आहे. यामुळे जमिनीचा कस चांगला असून ऊसाबरोबर इतर पीक ही शेतकरी घेत आहेत.


महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. कराड तालुक्यात 183 गावातील यादी तयार असून या गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.बहुतांश शेतकऱ्यांना सेवा सोसायट्यांनी कर्ज दिले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज वितरित करण्यात आले आहे. कराड तालुक्यात ८ हजार ४६१ शेतकरी कर्जदार आहेत.यापैकी ४१४१ शेतकऱ्यांना सेवा सोसायटी व जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कर्ज वितरित केले होते या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.दरम्यान आज अखेर २५४४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असून उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू असून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक, विकास सेवा सोसायटी, महा-ई-सेवा केंद्र याठिकाणी राहिलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे यासाठी तहसील कार्यालयाच्यावतीने प्रयत्न केला जात आहे.