यशवंतराव मोहिते यांच्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीची पायाभरणी : शरद पवार
यशवंतराव मोहिते यांच्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीची पायाभरणी : शरद पवार

 

कराड, प्रतिनिधी : यशवंतराव मोहिते पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी कोयनेचे धरण झाले पाहिजे, असा आग्रह विधिमंडळात मांडला. धरणाच्या उभारणीबरोबर त्यांनी वीज निर्मिती व शेतीची प्रगती हा सखोल विचार मांडून त्यांनी हे धरण मंजूर केले. त्यांनी प्रत्येक खात्यामध्ये आपल्या अभ्यासपूर्ण वकृत्वाच्या जोरावर जबरदस्त ठसा उमटवला. त्यांच्या विधिमंडळात केलेल्या काही गोष्टी लक्षात राहणाऱ्या व ऐतिहासिक होत्या. त्यामध्ये त्यांच्या विचारातून कोयना धरण, कापूस एकाधिकार योजना व संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठराव या गोष्टी महत्वपूर्ण आहेत. असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

 

मुंबई येथे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात थोर विचारवंत यशवंतराव मोहिते, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, लोकनेते राजारामबापू पाटील, रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे संस्मरण समारंभात ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

शरद पवार म्हणाले, भाऊंनी कोयना धरण उभारताना वीज निर्मितीचे महत्व विस्तृतपणे सांगितले. वीजेच्या निर्मितीबरोबर शेतीची समृद्धी होण्यामध्ये हे धरण महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे वीज व शेतीसाठी पाणी यातून महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेने नेण्याची कामगिरी त्यांनी केली. आज घडीला आपण सर्वजण धरणांबाबत जागृत असताना दिसतो. याची पायाभरणी यशवंतराव भाऊंनी केली. भाऊ व बाळासाहेब देसाई या दोघांचे योगदान यामध्ये आहे. कोयना धरण व्हावे, हा पहिला विचार भाऊंनी मांडला. 

 

ते म्हणाले, सयुंक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठरावही त्यांनी देशात पहिल्यांदा मांडला. त्यांच्या पत्नी जाई मोहिते ह्या विदर्भ कन्या असल्याने त्यांचे विदर्भात जाणे-येणे होते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा यामधील जवळीकता वाढवण्याचे काम भाऊंनी केले. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, ही वेदाइतकी पवित्र भूमिका त्यांनी मांडली. सयुंक्त महाराष्ट्रासाठी प्रेताच्या राशी पडल्या तरी मागे न हटण्याची भूमिका त्यांची होती. एकसंघ महाराष्ट्र राखण्यासाठी हे राज्य केंद्रापुढे झुकणार व मोडणार पण नाही, ही ठाम भूमिकाही त्यांचीच होती. 

 

ते म्हणाले, मराठवाडा, खानदेश व विदर्भाला एकसंघ राखण्यासाठी त्यांनी कापूस एकाधिकार योजना आणली. भाऊ ऊस पट्यातील असूनही त्यांनी कापूस योजनेच्या निर्मितीतून एकसंघ महाराष्ट्राची भूमिका कायम ठेवली. कराडला कृष्णा कारखाना उभारण्याचे त्यांनीच काम केले. त्यावेळेस कारखान्याचे काम पाहणारे दुसरे असले, तरी त्यांच्या पाठीशी भाऊंची शक्ती होती. सहकारी साखर कारखानदारी, संस्था व कार्यकर्त्यांना पूर्णपणे ताकद देण्याची भूमिका त्यांनी घेतली. याचे उत्तम उदाहरण पतंगराव कदम हे आहेत. पतंगराव कदम यांच्यामधील कर्तृत्व ओळखून त्यांना भाऊंनी प्रोत्साहीत केले. त्यातून भारती विद्यापीठाची स्थापना झाली. भाऊ भारती विद्यापीठाचे तहह्यात अध्यक्ष होते. त्यांच्या विचारातून पतंगराव यांनी कष्ठातून दर्जेदार संस्था उभा केल्या. आजघडीला तेथे सव्वातीन लाख विध्यार्थी शिकत आहेत. भाऊंच्यानंतर कदम यांच्या पिढीने त्यांचे ऋण अद्याप सोडलेले नाही. 

 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या चारही विभूती आपल्यासमोर  दीपस्तंभ आहेत. त्यांनी राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. अशा विभूतींचे दर आठवड्यास सभागृहात स्मरण करू या. शिवराज पाटील,  देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. यावेळी 'संस्मरण पुष्प' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, कुमार केतकर यांची व्याख्याने झाली.

 

कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री डॉ. एन. डी. पाटील, आण्णासाहेब डांगे, भाऊंच्या कन्या अरुंधती सावंत, जावई रवींद्र सावंत, स्नूषा डॉ. सविता मोहिते, नातवंडे रागिणी व विश्वेंद्र मोहिते उपस्थित होते.

 

भाऊंना आम्ही चिठ्या द्यायचो......

 

शरद पवार म्हणाले, विधिमंडळात भाऊ प्रत्येक विषय तासनतास मांडायचे. त्यावेळेला आम्ही ज्युनियर होतो. सभागृहात आम्ही त्यांचे सर्व विषय मंजूर करतो पण भाषण आटोपते घ्या, अशा चिठ्या द्यायचो. याचा राग व लोभ त्यांना कधीच नसायचा. भाऊंची प्रत्येक विषयाची मांडणी आपल्याला दिशा देणारी होती.