कराड येथे ‘स्वॅब टेस्टिंग लॅब’ साठी परवानगी द्यावी : खा. श्रीनिवास पाटील यांचीआरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे मागणी


कराड येथे ‘स्वॅब टेस्टिंग लॅब’ साठी परवानगी द्यावी : खा. श्रीनिवास पाटील यांचीआरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे मागणी


कराड : कोरोनाचे निदान होण्यासाठी कराड येथे ‘स्वॅब टेस्टिंग लॅब’ होणे गरजेचे असल्याने त्यास परवानगी द्यावी अशी मागणी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे. दरम्यान खा. पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी कराड येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ते माघारी साताराला जात असताना त्यांनी खा. श्रीनिवास पाटील यांची कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. 30 खाटांचा विलगीकरण कक्ष कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये काढल्याची माहिती खा. पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत कोरोना संबंधित अनेक बाबींवर जिल्ह्याने केलेल्या तयारीवर उपयुक्त माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. कृष्णा मेडीकल कॉलेजचे डॉ. क्षिरसागर यांनी खा. श्रीनिवास पाटील यांना कृष्णा मेडिकल कॉलेज मध्ये स्वॅब टेस्टिंग लॅब काढण्याची पूर्ण तयारी केली असून त्यास परवानगी मिळत नाही. असे सांगितल्यावरून खा. श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे फोनवरून संपर्क साधला. ना. राजेश टोपे यांनी दिल्ली येथील इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ रिसर्चचे डायरेक्टर डॉ. बलराम भार्गव यांचा दूरध्वनी नंबर खा. पाटील यांना दिला. तसेच खासदार म्हणून त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत खा. पाटील यांना सुचवले. 


त्यानुसार खा. श्रीनिवास पाटील यांनी डॉ. भार्गव यांच्याशी संपर्क साधून संबंधित स्वॅब टेस्टिंग लॅब मिळवण्यासाठी केलेल्या विनंतीचे कागदपत्रे व्हाट्सअप वरून पोहोचवले. तसेच डॉ. क्षिरसागर व डॉ. भार्गव या दोघांमध्ये चर्चा घडवून आणली. डॉ. बलराम भार्गव यांनी खा. श्रीनिवास पाटील यांना कराड येथे कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये स्वॅब स्टेटिंग लॅब उघडण्याची परवानगी दोन दिवसात देण्याचे मान्य केल्याचे कळवले.


दरम्यान खा. श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिका-यांशी चर्चा करून कोरोना बाबत जिल्ह्यात कोणकोणत्या उपाययोजना सुरू आहेत याविषयी सविस्तर माहिती घेतली.