कोरोनाची जगातील पहिली मराठी भाषेत मुलाखत मलाच जगात राहायचे नाही असे का म्हणतोय कोरोना... प्रतिबंध करण्यासाठी मार्ग काढा... कोरोनाची प्रतिक्रिया


कोरोनाची जगातील पहिली मराठी भाषेत मुलाखत
मलाच जगात राहायचे नाही असे का म्हणतोय कोरोना... प्रतिबंध करण्यासाठी मार्ग काढा... कोरोनाची प्रतिक्रिया


जगातील 170 देशात धुमाकूळ घालणाऱ्या व लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोनाला भेटून त्याची मुलाखत घेण्याचा योग आला. काय म्हणतोय कोरोना ? पृथ्वीतलावर कसा आला ? कधी जाणार इथून ? जगात काय करतोय ? याबाबत त्याच्याशी केलेली काल्पनिक बातचीत..... गोरख तावरे - 9326711721


प्रश्न : कोरोना प्रथमता तुला नमस्कार करावा की न करावा असा प्रश्नच पडला आहे ?
कोरोना : मला नमस्कार केला किंवा नाही केला तरी, मला फारसा फरक पडणार नाही. माझे स्वागत करावे, असे मी कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे तुमच्याकडून नमस्काराची अपेक्षाच नाही.


प्रश्न : अख्या जगाला तू असा का त्रास देत आहेस ?
कोरोना : मीहून कुणालाही त्रास देत नाही. मात्र मी बाधित केलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर मी दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो, यात माझा काहीच दोष नाही.


प्रश्न : तु मुळात आलासच कशासाठी ?
कोरोना : माझे येण्याचे कोणतेही सुखकारक कारण नाही. कारण मनुष्याने त्याच्यासाठी निर्माण केलेल्या जीवनसत्वयुक्त अन्न सोडून इतर मुक्या प्राण्यांना निर्दयपणे मारून खाल्ल्यानंतर त्यातून माझी निर्मिती झाली आहे. मनुष्याने जर असे कृत्य केले नसते तर मुळात माझा जन्मच झाला नसता.


प्रश्न : मग तुझ्या जन्माला अर्थ नसताना असा जगभरात धुमाळ का घालतो आहेस ?
कोरोना : मलाही अनेकांचा त्रास देण्यात कोणताही आनंद वाटत नाही. मात्र मी मनुष्याच्या शरीरात प्रवेश केल्यावर त्यांची असणारी प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे माझा प्रभाव वाढतो त्याला माझा काही दोष नाही ?


प्रश्न : मग दोष कोणाचा ?
कोरोना : तुम्हा सर्वांचा, सकस, चांगले, पौष्टिक अन्न खावा... तंदुरुस्त रहा.. दररोज व्यायाम करा.. प्रतिकार शक्ती वाढवा..म्हणजे माझा प्रभाव तुमच्यावर होणार नाही अथवा माझ्यामुळे तुम्ही "कोरोना वायरस बाधित" होणार नाही.


प्रश्न : तुझ्या येण्यामुळे जगभरातील 170 देश लॉकडाऊन झाले आहेत, ही तुला भूषणावह बाब वाटते काय ?
कोरोना : मला ही अतिशय दुःख होतंय. कारण जगभरातील इतके देश एका वेळेला लॉकडाऊन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.जगभरातील वैज्ञानिकांनी मला प्रतिबंध करण्यासाठी लवकरात लवकर औषध शोधावे आणि या पृथ्वीतलावरून मला मुक्त करावे, माझा समूळ नायनाट करावा, असे मलाही वाटते आहे. मात्र जगभरातील वैज्ञानिकांना अदयाप मला खतम करण्याचा मार्ग सापडला नाही, हे माझे दुर्दैव आहे. मी मानवजातीला संपवण्यासाठी आलो असलो तरी, मानवाने आपल्या बुद्धी कौशल्याने मला संपवावे, असे मी आवाहन करीत आहे.


प्रश्न : वरील प्रश्नाचे उत्तर म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा आहे ?
कोरोना : बरोबर.. माझा जन्म व प्रवेश तर झाला आहे. मला संपवणे इतकेच तुमच्या हाती आहे. हो आणि जगभरातील प्रत्येक देशातील प्रमुखांनी लॉकडाऊन करून लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. याला जर प्रतिसाद दिला तर माझे वाढण्याचे प्रमाण कमी होईल. याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. उगाच मलाच दोष देण्यात काही अर्थ नाही. तुम्ही तुमची खबरदारी घेतली तर मी कुणाच्या घरात प्रवेश करीत नाही.


प्रश्न : आमच्या स्वातंत्र्यावर तू गदा आणतोयस ?
कोरोना : स्वातंत्र्याचा किती अतिरेक करावा. याचे तुम्हाला भानच राहिले नाही. ऊठसूट हव्यास, मत्सर, द्वेष सर्वकाही मलाच. याचाच विचार करत आहात ना तुम्ही. कधी समाजाचा, देशाचा, राज्याचा विचार केला आहे का ? स्वतःच्या फायद्याचा तेवढा विचार करता आणि अपयशाला धनी दुसरा ठरविता. मग यावर मीच नियंत्रण ठेवतोय आणि यशस्वी ही होतोय, म्हटल्यानंतर स्वातंत्र्याचा गळा का काढताय ? उलट कोरोनानेच असा उलटा प्रश्न केला.


प्रश्न : लाखो नागरिकांचा जीव घेऊन तुला आनंद होतो काय ?
कोरोना : नागरिकांचा जीव घेऊन कसा आनंद वाटेल ? वास्तविक याचे मलाही दुःख आहे. मात्र पृथ्वीतलावर प्रवेश केल्यानंतर माझ्या हातात काहीच राहिले नाही. यामुळे मी प्रत्येकाच्या शरीरात प्रवेश करतो, हे तुम्हीच रोखू शकता. मला आपल्या शरीरात प्रवेश करण्यापासून.


प्रश्न : कोरोना तू निर्दयी आहेस, तुला माणुसकी नाही, लहान-मोठे वयोवृद्ध असा तू भेदभाव करीत नाहीस ?
कोरोना : होय मी निर्दयी आहे, हे मला मान्य आहे. माझ्यात माणुसकी तर बिलकुलच नाही. मी लहान-मोठे वयोवृद्ध असा भेदभाव करणार नाही.इतकेच काय तर जात, धर्म, पंथ असा कोणताही मी भेदभाव करीत नाही. म्हणून मी पुन्हा तुला सांगतोय, माझ्या हातात काही राहिले नाही. लोकांनीच आता स्वतःची दक्षता घ्यावी, घराबाहेर पडू नये, माझा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी सरकार व तज्ञांकडून मिळणार्‍या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. आत्ता तरी मी एवढेच सांगू शकतो.


प्रश्न : तुला बरेच उलटेसुलटे प्रश्न करावयाचे आहेत. मात्र ते जाऊ दे ! फक्त कोरोना तू एवढेच सांग की, तू पृथ्वीतलावरून केव्हा जाणार आहेस ?
कोरोना : मी पृथ्वीतलावर केव्हा येणार याची पूर्वसूचना दिलेली नव्हती. यामुळे मी केव्हा जाणार हे सांगता येत नाही. मलाही दुःखदायक परिस्थिती बघायची नाही. निरपराधांचे जीव घ्यायचे नाहीत. माझा धसक्का इतका मोठा प्रमाणात जगभरात घेतील असे मलाही वाटले नाही. ज्याच्या येण्याने आनंद व स्वागत होत नाही, त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही हेही मला समजते. केवळ माझे कोरोना नाव घेतले तर अनेक जण गर्भगळीत होतात. मी येऊ नये यासाठी दक्षता घेतात. माझ्या जन्माचा व पृथ्वीतलावर येण्याला काही अर्थ राहिला नाही. अखिल मानवजातीला व पृथ्वीतलावरील प्रत्येकांना मी नकोच आहे.अखेर मीच जगभरातील विद्वानांना, संशोधकांना, तज्ञांना विनंती करतो की, मला प्रतिबंध करण्यासाठी लवकरात लवकर औषध शोधावे. जोपर्यंत मला हटविण्यासाठी आणि संपविण्यासाठी पर्याय उपलब्ध होत नाहीत. तोपर्यंत प्रत्येकाने आपली स्वतःची व कुटुंबाचे काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, मला रोखण्यासाठी जगभरातील देशांनी व भारतातील प्रत्येक राज्याने विशेषता महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी उपाय योजना केल्या आहेत. त्याचे पालन करावे. एवढेच मी सांगू शकतो.


प्रश्न : हे मात्र अती होतय, मरणयातना देतोय आणि चांगल्या सूचनाही करतोयस ?
कोरोना : मी एक व्हायरस आहे. मला मन, भावना, संवेदना अशा काही नाहीत. मुळात माझा जन्मच कशासाठी ? का झाला ? हा प्रश्नच आहे. लोकांना मरणयातना देताना मला आनंद होत नाही. हे मला सांगताही येत नाही. इतरांना दुःखी करून वेदना देणे हे माझ्या जन्माचे कारण असावे.जगभरातल्या व विशेषता महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या प्रामाणिकपणाबद्दल चांगल्या सूचना कराव्याशा वाटतात ते मी करतोय. यात गैर वाटण्यासारखे काहीच नाही. किमान मला प्रतिबंध करण्याच्या सूचनांचे तरी गांभीर्याने विचार करावा.


प्रश्न ओके मात्र, मी तुला धन्यवाद देणार नाही.
कोरोना : मला तशी अपेक्षाही नाही. मात्र जगभरात मी धुमाकूळ घालत असताना तुझ्यासारखा सजग पत्रकार गोरख तावरे भेटला आणि मलाही बोलता आले. शेवटची एकच अपेक्षा व्यक्त करतो, खरेच मला या पृथ्वीतलावरून हाकलून लावा.माझा समूळ नायनाट करा. आणि कोरोना नामक शापित जीवनातून मुक्त करा. माझा शेवट होवू दे. कोरोना नावाचा कुणी दृष्ट पृथ्वीवर आला होता. त्यांने संपूर्ण मानव जातीला हादरवून सोडले. अनेकांचे जीव घेतले. असा शिव्यासाप दिला तरी हरकत नाही. जातो आता मी. घराबाहेर येऊन कोणी रस्त्यावर मुक्त संचार करत असेल तर त्याला कोरोना व्हायरस बाधित करण्याचे माझे काम आहे. ते आता करतो.


प्रश्न : म्हणजे तु तुझे काम करीतच राहणार ?
कोरोना : ते माझे कर्तव्य आहे. ते मला करावेच लागेल. उगाच जादा प्रश्नांची सरबत्ती नको. "कोरोना व्हायरस बाधित" असा मला लागलेला कलंक पुसण्यासाठी जेवढ्या लवकर जे चांगले करता येईल तेवढे करावे. यापेक्षा जादा काही मी सांगू शकत नाही. मात्र तोपर्यंत मी माझे काम चालूच ठेवणार आहे.


(कोरोनाबाबत काल्पनिक प्रश्न उत्तरे केलेले आहेत. कृपया सदरची मुलाखत फॉरवर्ड अथवा कॉपी-पेस्ट करताना मूळ मुलाखतकार गोरख तावरे - 9326711721 यांचे नाव तसेच ठेवावे यात बदल करू नये. )