शंभूराज देसाईंना लोकनेतेसाहेबांनी दिलेल्या राजकीय बाळकडूच्या छायाचित्राला उजाळा


शंभूराज देसाईंना लोकनेतेसाहेबांनी दिलेल्या राजकीय बाळकडूच्या छायाचित्राला उजाळा


 मराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा ११० वा जयंती सोहळा आज दि.१० मार्च रोजी साजरा होत असताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी नातू राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांना मांडीवर घेवून त्यांचे कानाला लावलेल्या फोनचे बालपणीचे त्यांचे छायाचित्र संपुर्ण सोशल मिडीयावर प्रसारित झाले आहे.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या या बालपणीच्या छायाचित्रामुळे लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांचे नातू शंभूराज देसाईंना बालपणीच राजकारणाचे राजकीय बाळकडू दिल्याने पहिल्यांदाच राज्याचे राज्यमंत्री झालेनंतर आपल्या आजोबांनी लौकिक मिळविलेले गृहखात्याचे राज्यमंत्री होण्याची त्यांना संधी मिळाली असून आजोबाप्रमाणे नातूही राज्याच्या गृहखात्यामध्ये उल्लेखनीय काम करुन दाखविणार असल्याची चर्चा फेसबुक,व्हाटस अप या सोशल मिडीयावर पहावयाला मिळत आहे.यानिमित्ताने या छायाचित्राला आज इतक्या वर्षांनी उजाळा मिळाला आहे.


          महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून अवघ्या महाराष्ट्र राज्याला लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ओळख आहे. राज्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सार्वजनीक बांधकाम,कृषी,शिक्षण,महसूल विभागाचे मंत्री म्हणून काम पाहिलेले लोकनेते बाळासाहेब देसाई हे करारी गृहमंत्री म्हणून सर्वांना परिचित आहेत.सार्वजनीक बांधकाम,कृषी,शिक्षण, महसूल विभागाचे मंत्री म्हणून काम करताना राज्यातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्षात आमलांत आणले. तर गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द संपुर्ण महाराष्ट्रात अजरामर आणि अतुलनीय ठरली.लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी गृहखात्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचे दाखले आजही राज्यातील मातब्बर राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात काम करीत असताना देत असतात.महाराष्ट्र राज्यामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचेसारखा दुसरा गृहमंत्री होणे नाही अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया राज्यातील मान्यवरांच्या तोंडून आजही एैकावयास मिळतात. तर त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आजही मोठया अभिमानाने गौरव केला जातो.


          लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब राज्याचे मंत्री असताना त्यांचे वास्तव्य “मेघदुत” या शासकीय निवासस्थानी होते. त्यांचे नातू आणि आत्ताचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा जन्म मुंबईचा. त्यांचे संपुर्ण बालपण हे मुंबई येथे “मेघदुत” बंगल्यावरच लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे सहवासातच गेले.लोकनेतेसाहेब “मेघदुत” बंगल्यावर असल्यानंतर त्या काळात आपल्या नातवंडामध्ये रममाण व्हायचे. असेच एके दिवशी “मेघदुत” बंगल्यावर लोकनेतेसाहेब असताना ते फोनवरुन बोलत असताना नातू शंभूराज देसाई हे त्यांच्या दालनात आल्याचे पाहून लोकनेतेसाहेबांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवून आपल्या कानाचा फोन शंभूराज यांच्या कानाला लावून फोनवर बोलणाऱ्या पुढील व्यक्तीस लोकनेतेसाहेब म्हणाले,माझा नातू शंभूराज बोलतोय त्याच्याशी बोला.हा बोलका प्रसंग त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या छायाचित्रकारांने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला.त्याचवेळी लोकनेतेसाहेबांना भेटण्याकरीता ज्येष्ठ पत्रकार प्र.के. अत्रे हे “मेघदुत” बंगल्यावर आले होते.तेव्हा त्यांनीही हा बोलका प्रसंग पाहिल्यानंतर तात्काळ त्या छायाचित्रकाराकडून कॅमेराबंद केलेले ते छायाचित्र मिळविले.


आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये “महाराष्ट्राचे मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई हे आपल्या नातवाला राजकारणाचे बाळकूड देताना” या मथळयाखाली बातमी प्रसिध्द केली. ती बातमी आज तंतोतत खरी ठरली असून आज अनेक वर्षानी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या ११० जयंती दिनी हेच छायाचित्र संपुर्ण सोशल मिडीयावर प्रसारित झाले आहे. “आजोबा गृहमंत्री तर नातू गृहराज्यमंत्री” हा योगायोग तर आहेच परंतू असे उदाहरण राज्याच्या राजकारणात कुठे पहावयास मिळत नाही.आज ना.शंभूराज देसाई राज्याचे गृहराज्यमंत्री असताना इतक्या वर्षांनी त्यांचे बालपणीच्या आजोबा लोकनेतेसाहेब यांचेसोबतच्या छायाचित्राला उजाळा मिळाला असल्याने या छायाचित्राचे सर्वत्र कौतुक होत आहेच परंतू लोकनेतेसाहेबांचा राजकीय,सामाजीक वारसा त्यांचे नातू गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे लिलया पेलत असून आपले आजोबा लोकनेतेसाहेब यांच्याप्रमाणे त्यांचे नातूही तितकेच करारी आहेत याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे.


            एखाद्या लौकीक प्राप्त व्यक्तीचा उध्दार त्याची तिसरी पिढी करते असे म्हंटले जाते,त्याचप्रमाणे आपल्या आजोबांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव,त्यांच्या विचारांचा जागर तसेच लोकनेतेसाहेबांचा असणारा दरारा आणि राज्याच्या राजकारणावरील वचक व त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकरीता केलेल्या तोलामोलाच्या कार्यानुसार त्याच तोलामोलाप्रमाणे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईसाहेब हे गत ३६ वर्षापासून हे कार्य पाटण मतदारसंघात आणि आता महाराष्ट्र राज्यात करीत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे.