अध्ययन अध्यापन प्रक्रियेत नवीन बदल आवश्यक: डॉ. प्रतिभा पाटणकर

अध्ययन अध्यापन प्रक्रियेत नवीन बदल आवश्यक: डॉ. प्रतिभा पाटणकर


कोल्हापूर - आजच्या तंत्रज्ञान युगातील बदलांनुसार शिक्षणक्षेत्रातील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानानुसार झालेले बदल आत्मसात करुन अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी भावी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन शिक्षणशास्त्र विभगाच्या प्रमुख प्रा. डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी केले. 


 शिक्षणशास्त्र विभाग येथे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र व शिक्षणशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साधनांचे बदलते स्वरुप या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्धाटन संमारंभाच्या अध्यक्षस्थानवरुन त्या बोलत होत्या. सदर कार्यशाळेचे उद्धाटन कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांचे हस्ते झाले. यावेळी डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले.


 डॉ. गुरव म्हणाले की, आज शिक्षण प्रक्रियेतील बदल लक्षात घेवून अभ्यासक्रम तयार झाले आहेत पण याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकांनी सतत नव्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे व नवीन ज्ञान सातत्याने आत्मसात केले पाहिजे. या कार्यशाळेमध्ये भोगावती महाविद्यालय कुरुकली येथील ग्रंथपाल श्री. पी. एस. कल्लोली यांनी कनेक्टिंग क्लासरुम या विषयावर मार्गदर्शन केले. व भैरवनाथ माध्यमिक हायस्कुल भुयेवाडी येथील शिक्षक श्री. एम. आर. पाटील यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले.


 या कार्यशाळेमध्ये शिक्षणशास्त्र विभाग, कै. बी. जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, ज्युनीयर कॉलेज ऑफ एज्युकेशन पेटाळा, वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय कळंबा, ताराराणी कॉलेज ऑफ एज्युकेशन कोल्हापूर  येथील शिक्षक व विद्यार्थ्यींनी कृतीयुक्त सहभाग घेतला.  या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी काम पाहिले, विभागातील शिक्षक डॉ. श्रीम. नगिना माळी, डॉ. श्रीम. सुप्रिया पाटील, श्रीराम सोनवणे, श्रीम. सरस्वती कांबळे,यांचे सहकार्य लाभले.