कोयना धरणात पाच टीएमसी मृतसाठा गृहीत धरला जातोय


कोयना धरणात पाच टीएमसी मृतसाठा गृहीत धरला जातोय


कराड - कोयना धरणाचा पाणलोट क्षेत्र 64 किलोमीटरचा असल्यामुळे डोंगरदऱ्यातून वाहून येणारे पाणी कोयना धरणात अडविण्यात आलेले आहे. धरणातील पाणी वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापरले जाते. दरम्यान धरणातील पाणी व पावसाळ्यात धरणामध्ये येणाऱ्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात गाळ येत असतो. यामुळे कोयना धरणात पाच टीएमसी मृतसाठा गृहीत धरला जातो.


कोयना धरणाची 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता आहे. पावसाच्या दिवसात अतिरिक्त पाणी धरणातून सोडले जाते. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाणी भरत असताना डोंगरदऱ्यातील येणारा गाळ धरणात येत असतो. दरम्यान कोयना धरणातील एकूण पाणीसाठा, पावसाळ्यात वाहत्या पाण्यासोबत धरणात वाढणारा गाळ याबाबत केवळ मृतसाठा पाच टीएमसी एवढ्याच वर्षानुवर्षाच्या ठोकळ आकडेवारीचा आधार घेतला जातो.


वास्तविक किमान दर पाच वर्षांनी याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. 2002 साली मेरी इन्टीट्युट (नाशिक) या संस्थेने किरणांद्वारे गाळाची तपासणी करून माहिती दिली होती. त्यानंतर गेल्या अठरा वर्षांत याबाबतची कोणतीही तपासणी झाली नाही. दरम्यान या काळात किती प्रमाणात गाळ वाढला याचे मोजमाप झालेले नाही. २००२ साली या धरणात काही प्रमाणात जास्त गाळ असल्याचे सांगण्यात आले आहे. मग मधल्या काळात त्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना झाल्या किंवा नाहीत याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.


सॅटेलाईट, संगणक क्रांती, अत्याधुनिक प्रयोगशाळा असे तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांचे पाण्याबाबत भवितव्य ठरविणार्‍या कोयना धरणाची तांत्रिक यंत्रणा अद्यापही जुनीच आहे. बहुतांश ठिकाणी जुनेच फॉर्मुले वापरण्यात येत असल्याने तांत्रिक आकडेवारीचा मेळ बसत नाही. केवळ ठोकळ माहिती व त्या आधारावर व्यवस्थापन करणेसाठी प्रशासनही हतबल आहे. दरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणेची आता आवश्यक आहे.