कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता यात्रा, महोत्सव कार्यक्रमांवर प्रतिबंध - जिल्हाधिकारी शेखर सिंह


कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता यात्रा, महोत्सव कार्यक्रमांवर प्रतिबंध - जिल्हाधिकारी शेखर सिंह


सातारा - कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी  जिल्ह्यातील यात्रा, महोत्सव तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आला असून जिल्ह्यातील यात्रा आणि जत्रा मधील धार्मिक कार्यक्रम संबंधित देवस्थानचे पुजारी यांनी करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर‍ सिंह यांनी आज जनतेला केले आहे.


 औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील एकनाथसष्टी भव्य यात्रा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील   येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा इत्यादी धार्मिक महोत्सव संबंधित जिल्हाधिकारी यांनी रद्द केले आहेत. याच पार्श्वभूमीवर सातारा  जिल्ह्यातील यात्रा, महोत्सव तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.


 यात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. लोकांना प्रशिक्षित करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग न करण्याच्या सूचना द्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवा. जे या सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे   केल्या आहेत.


घंटा गाड्यांवरुनही कोरोनाबाबतची जनजागृती


 कोरोनाचा संसर्ग आजाराबाबत घ्यावयाची काळजी या संदर्भात जनजागृती करण्याच्या सूचना सर्व नगर परिषद व नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या होत्या. या अनुषंगाने आज सर्व नगर परिषद व नगर पंचायतींच्या कचरा उलणाऱ्या घंटा गाड्यांवरुन कोरोनाची धून आज सकाळी-सकाळी नागरिकांना ऐकू येत होती. या अभिनव उपक्रमातून जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाबतची जनजागृती करण्यात येत आहे.


कोरोनाबाबत दक्षता घेण्याच्या शाळा, महाविद्यालयांना सूचना


  कोणताही परदेशी नागरिक शाळेत येणार असल्यास त्याबाबतची माहिती पोलीस विभाग व आरोग्य विभागास द्यावी. तसेच विशेषत: महाबळेश्वर व पाचगणी येथे परदेशातून आलेले नागरिक ज्या हॉटेल व नातेवाईकांकडे  मुक्कामास आहेत किंवा कसे त्यांची माहिती एकत्रित करुन जिल्हा रुग्णालयास कळवावी. सर्व निवासी शाळा, महाविद्यलयांसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुन पूर्ण वेळ तैनात ठेवावी. शाळा व महाविद्यलयातील स्वच्छतेबाबत व आरोग्य विषयक सुविधांबाबत वारंवार तपासणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.


हॉटेल, ढाबे यांनाही सूचना


 सर्व हॉटेल, लॉज, ढाबे यामध्ये येणाऱ्या नागरिकांचे बसण्याचे टेबल, नेहमी हाताळणारे मेनूकार्ड, वॉश बेसीन, वॉश बेसीनचे नळ, शौचालय  तसेच ज्या ठिकाणी नागरिकांचा हाताचा स्पर्श होऊन संसर्गजन्य रोगाचा प्रादुभाव वाढण्याची शक्यता आहे, या सर्व बाबी दिवसातून वारंवार निर्जुंतुकीकरण करण्यात यावे. तसेच हायवेलगत राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील येणारे प्रवासी यांची लॉजमध्ये नोंदणी रजिस्टरमध्ये नोंदणी करावी. परदेशी नागरिक अथवा कोरोना बाधित संशयीत नागरिक आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागास व पोलीस विभागास कळविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व हॉटेल चालकांना दिल्या आहेत.