‘मास्क’ व ‘सॅनिटायझर’ चा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई


‘मास्क’ व ‘सॅनिटायझर’ चा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई


 सातारा - कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लोक ‘मास्क’ व ‘सॅनिटायझर’ वापरण्यासाठी औषध विक्रेत्यांकडे धाव धेत आहेत. त्याचा गैरफायदा घेवून विक्रेते काळाजाबर करत आहेत, असे राज्यात विविध भागात आढळून आले आहे. सातारा जिल्ह्यात असे आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करुन त्याचे दुकान सील करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही औषध विक्रेत्याने काळाबाजार करुन नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. गेल्या काही आठवड्यापासून भारतात उद्भवलेल्या कोरोना विषाणू (कोविड-19) च्या वाढत्या उपद्रवामुळे करण्यात येणाऱ्या उपायोजनांमध्ये एन 95 मास्क, 2/3 प्लाय सर्जिकल मास्क तसेच हात स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा सॅनिटायझर बहुतांश विक्रेत्यांकडे उपलब्ध नाही किंवा किंमतीपेक्षाही जास्त दराने विक्रीस उपलब्ध होत आहे, असे आढळून आले आहे. केंद्र शासनाने आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये एका अधिसुचनेद्वारे 30 जून 2020 अखेर वापरण्यात येणारा मास्क तसेच सॅनिटायझर या दोन वस्तू अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषीत केले आहे.  यानुसार राज्य शासनाला  विक्रेत्यांसोबत विचार विनिमय करुन या वस्तुंचे उत्पादन वाढविण्यासंबंधी तसेच या वस्तुंची किंमत निर्धारित करण्याविषयी अधिकार दिले आहेत.


 आवश्यक वस्तु अधिनियम 1955 मधील तरतुदीनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, निर्धारित किंमती पेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या तसेच पुरवठ्याचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध 7 वर्ष कैद किंवा आर्थिक दंड  किंवा दोन्ही शिक्षेची तरतुद आहे. काळाबाजार करणाऱ्यांना जास्तीत जास्त 6 महिन्यांसाठी नजर बंद ठेवता येते. 
 
 केंद्र शासनाचा हा निर्णय एन 95 मास्क, 2/3 पीएलवाय मास्क तसेच हात स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा सॅनिटायझरच्या नियंत्रित उत्पादन, गुणवत्ता तसेच सहजरित्या वितरण व विक्री करण्याबरोबच तसेच याची जास्त दराने विक्री अथवा काळाबाजार करणाऱ्यासाठी सशक्त असा कायदा आहे. या दोन वस्तूं सर्वसामान्य जनतेला योग्य व रास्त किंमतीत उपलब्ध करुन देण्यासाठी उपयोग होईल. या संबंधी ग्राहकांच्या काही तक्रारी किंवा शंका असल्यास  राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1800-11-4000, ऑनलाईन तक्रारीः www.consumerhelpline.gov.in, विभागाची वेबसाइट www.consumeraffairs.nic.in, dsadmin-ca@nic.in आणि dirwm-ca@nic.in, secy.doca@gov.in वर संपर्क साधावा.