“चुल आणि मुल ” या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिलांनी बाहेर येवून आपली प्रगती साधावी - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई


“चुल आणि मुल ” या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिलांनी बाहेर येवून आपली प्रगती साधावी - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई


कराड - जगभरात आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असून  ग्रामीण भागातील महिलांनी “ चुल आणि मुल ” या संकल्पनेतुन बाहेर येवून प्रगती साधण्याकरीता पुढाकार घ्यावा. आजच्या युगात महिलांना विविध क्षेत्रात पाऊल ठेवून प्रगती साधता येणे सहज शक्य आहे. शहरातील सर्व मुली,महिला सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहेत. ग्रामीण भागातील महिलांमध्येही बुध्दीमत्ता,कल्पनाशक्ती मोठया प्रमाणात आहेत.आपली प्रतिमा आणि प्रतिभा निर्माण करुन ग्रामीण भागातील महिलांनी विविध क्षेत्रामध्ये चमक दाखवावी असे प्रतिपादन राज्याचे गृह,वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.


 मरळी (ता.पाटण) येथे महिला दिनानिमित्त मारुलहवेली पंचायत समिती गणाच्यावतीने महिलांचा ५ वा सस्नेह मेळावा व हळदी कुंकु कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मेळाव्याचे उदघाटन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा परीषद गटाच्या जि.प.सदस्या सुग्रा खोंदू,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे,जि.प.सदस्य विजय पवार,माजी सदस्य जालंदर पाटील, सामाजीक कार्यकर्त्या राणी पाटील,पाटण तालुका महिला सरपंच परीषदेच्या अध्यक्षा वैशाली मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती.


महिलांनी एकत्रित येवून क्षमतेप्रमाणे महिलांकरीता व्यवसाय उभारणी करावी. महिला बचत गटांची निर्मिती करावी. जेणेकरुन याचा लाभ महिलांच्या प्रगतीकरीता त्यांच्या कुटुंबाकरीता होईल. ग्रामीण भागातील महिलांसाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्याचे नियोजन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.महिलांवरील अत्याचाराच्या होणाऱ्या घटना पाहून मुख्यमंत्री यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हयात सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असणाऱ्या किमान एक महिला पोलीस ठाण्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पामध्ये विधानपरीषदेमध्ये याची घोषणा देखील केली आहे. असेही ते शेवटी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.


यावेळी सामाजीक कार्यकर्त्या राणी पाटील यांनी “चला नाती जपुया” व पाटण तालुका महिला सरपंच परीषदेच्या अध्यक्षा वैशाली मोकाशी “महिला व्यवसाय उभारणी व बचत गट” या विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्यावतीने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीचे सादरीकरण करण्यात आले. मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,ग्रामपंचायत मरळी,मरळी विकास सेवा सोसायटी,ज्योतिर्लिंग दुध संघ,शंभूराज युवा संघटना मरळी यांच्या वतीने करण्यात आले होते.