महिलांमध्ये मोठी गुणवत्ता हे वेळोवेळी सिद्ध ; स्त्रियांनी जिद्दीने व हिमतीने पुढे जा -  रामचंद्र शिंदे       


स्त्रियांमध्ये मोठी गुणवत्ता हे वेळोवेळी सिद्ध ; स्त्रियांनी जिद्दीने व हिमतीने पुढे जा -  रामचंद्र शिंदे 


सातारा - स्त्रियांमध्ये मोठी गुणवत्ता असते हे आता वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तरी महिलांनी यशस्वी होण्यासाठी जिद्दीने आणि हिमतीने प्रयत्न करावेत, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आज केले.


8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त बालकां विषयक असणाऱ्या कायद्यांची माहिती व्हावी यासाठी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत येथील हॉटेल लेक व्हयूमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे बोलत होते. या कार्यशाळेला प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे आदी उपस्थित होते.


देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी असो माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील असो अनेक स्त्रीयांनी त्या त्या क्षेत्रात स्व कर्तुत्वावर मोठी मोठी पदे भुषवल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे महिलांनी जिद्दीने आणि हिंमतीने पुढे जाण्यासाठी वरील उदाहरणे उल्लेखनीय व दिपस्तंभ म्हणून पहावे, असे अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांनी सांगून त्यांनी 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनाच्या उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या.


 यावळी प्राचायॅ डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, भारतीय घटनेने स्त्री-पुरुषांना समान हक्क दिले.वास्तवीक काळाची कठीण आव्हाने पेलण्याची क्षमता स्त्रीयांकडे असते. प्रेम, करुणा, त्याग ही मूल्ये स्त्रीयांकडे उपजत असतात. त्यांना कुटुंबात आणि समाजात सन्मानाची संधी दिली पाहिजे.  लहान मूल आईच्या मांडीवर वाढते, आईची मांडी ही त्याची पहिली संस्कार शाळा असते. प्रेमळ सहवासातून सुरक्षिततेची भावना वाढते. आजचे बालक हेच उद्याच्या राष्ट्राचे आशास्थान असते. त्या दृष्टीने महिला शक्तीला न्याय मिळण्यासाठी ममतेचा आणि समतेचा पुरस्कार करणारी समाज व्यवस्था आकाराला आली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले. या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.