जिल्ह्यात अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह.....कराड अतिक्रमण मोहिमेबाबत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण
कराड - कराड नगरपालिकेचे अतिक्रमण मोहीम यशस्वीपणे राबविली याचा संदेश संपूर्ण सातारा जिल्ह्यात पोहोचवण्याचा मनोदय जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला असून अतिक्रमण मोहिमेबाबत आता सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणीसह इतर शहरांतील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांवर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सलग चार दिवस अतिक्रमण मोहीम राबवून कराड शहरातील सर्व अतिक्रमणे दूर केली आहेत. दरम्यान या अतिक्रमण मोहिमेबाबत आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. दरम्यान कृष्णा घाटावर सुमारे वीस ते पंचवीस गाडे लावण्यात येतात. याबाबत नगरपालिका काय निर्णय घेणार ? अशी विचारणा होऊ लागली आहे. कारण कृष्णाबाई ट्रस्टच्या मालकीच्या जागेमध्ये सदरचे खाऊचे गाडे लावण्यात येत आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत आता वेगवेगळे वाद निर्माण होऊ लागले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी अतिक्रमण मोहिमेचे स्वागत करून लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता अतिक्रमण मोहीम का राबवली ? व्यापाऱ्यांचे नुकसान का केले ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर व्यापार्यांसोबत बैठक घेऊन विनायक पावस्कर यांनी सर्व व्यापाऱ्यांनी एका रंगातली एकसारखे फलक लावावेत, तीन ते चार फुटाच्या पायऱ्या कराव्यात. अशा सूचनांचा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे.
नगरपालिकेच्या हद्दीतील अतिक्रमणाबाबत नगरपालिका प्रशासनाबरोबरच वरिष्ठ अधिका-यांपर्यंत गेल्या दहा वर्षापासून तक्रारी केल्या आहेत. मात्र याबाबत कारवाई झाली नाही दरम्यान सध्या नगरपालिका प्रशासनाने केलेली कारवाई अत्यंत चांगली व प्रशंसनीय असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी व्यक्त केले आहे. रेवणकर, आणि भुर्के यांचे अतिक्रमण काढले म्हणून नगरसेवक विनायक पावसकर अतिक्रमण विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप गोरख शिंदे यांनी केला आहे. विनायक पावसकर यांनी शिळ्या कढीला ऊत आणू नये, कराडमधील अतिक्रमण हटाव मोहीम योग्यच आहे. शहरातील अतिक्रमणाबाबत प्रशासनातील वरिष्ठांपर्यंत तक्रारी व पाठपुरावा केला आहे. अतिक्रमण हटाव मोहीमेबाबत कराडकरमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहरात २ भाजीमंडई आहेत पण भाजी विक्रेते रस्त्यावर बसतात असेही गोरख शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले
कराड शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमे विरोधात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आजपासून साखळी पध्दतीने आमरण उपोषणास सुरवात केली आहे.अतिक्रमण मोहिमेमध्ये दुजाभाव झाला असून मोठ्या धेंडांच्या अतिक्रमणे तसेच ठेवली आहेत. गोरगरीबांची अतिक्रमणे काढून त्यांच्या अन्याय केला असून गरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा, सर्वांना समानतेने न्याय द्यावा, यासाठी उपोषण असल्याचे आनंदराव लादे यांनी सांगितले. भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव लादे, वाहतुक सेना कराड अध्यक्ष आयाज शेख, फिरोज मुल्ला, कुंदन वाघमारे, अरुण वाघमारे, शामराव मोहिते, दत्तात्रय दुपटे हे नवीन प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला बसले आहेत.दरम्यान हॉकर्स झोनबाबत नगरपालिकेने लवकर निर्णय घेऊन हातगाडी व्यावसायिकांचे पुनर्वसनाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी हॉकर्स संघटनेचे जावेद नायकवडी यांनी केली आहे. कराड शहराच्या हद्दीत पुन्हा अतिक्रमणे उभे राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. अशी मागणी कराडकर नागरिकांनी केली आहे.