कराडमध्ये हॉकर्स झोनचा तिढा अखेर सुटला; बस स्थानक परिसरात एकच रिक्षा गेट होणार ! स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब


कराडमध्ये हॉकर्स झोनचा तिढा अखेर सुटला; बस स्थानक परिसरात एकच रिक्षा गेट होणार !
स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब


कराड - कराड शहरातील हॉकर्स झोनचा गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर अखेर गुरुवारी रात्री तोडगा निघाला. कराड नगरपरिषद स्थायी समिती सदस्यांच्या झालेल्या बैठकीत बसस्थानक परिसरातील हॉकर्स झोनवर शिक्कामोर्तब करण्यात आला.दरम्यान बसस्थानक परिसरातील सर्व रिक्षा गेट बंद करून एकच रिक्षा गेट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकारांना दिली.


नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, पाणीपुरवठा सभापती आशा मुळे, आरोग्य सभापती महेश कांबळे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, विनायक पावसकर, फारुख पटवेकर, तसेच पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हॉकर्स झोन बाबत चर्चा करत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. दरम्यान हातगाड्या संघटनेने आपले ठिय्या आंदोलन स्थगीत केल्याची माहिती जावेद नायकवडी, प्रमोद तोडकर यांनी दिली.


हातगाडे संघटनेच्या एकूण 107 हातगाडे अधिकृत मांडण्यात आले असून प्रत्येकाला ड्रेसकोड दिला जाणार आहे. त्याचबरोबर नगरपालिका व पोलिस खात्याचे संयुक्तिक ओळखपत्र दिले जाणार आहे.निश्चित केलेल्या जागांमध्ये पक्षपातीपणा होऊ नये, यासाठी चिठ्ठीद्वारे प्रत्येकांची जागा निश्चित केली जाणार असल्याचेही राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले. कर्मवीर भाऊराव पुतळा नजीक, नवग्रह मंदिरा समोरील बसस्थानकाच्या भिंतीलगत, जुन्या राजमहल टॉकीज समोरील रिकाम्या जागेत हातगाडे चालकांना व्यवसायासाठी जागा देण्यात येणार आहे. कराड शहरात इतरत्र असणारे हातगाडे हे बेकायदेशीर गाडे म्हणून गणले जाणार आहेत. त्याचबरोबर बसस्थानक परिसरात अनेक रिक्षा गेट आहेत. ते सर्व रिक्षा गेट बंद करून एकच रिक्षा गेट तयार करण्यात येत आहे. यामध्ये नवग्रह मंदिराजवळ प्रवासी रिक्षामध्ये घेता येतील आणि जुने राजमहाल चित्रमंदिर येथे प्रवाशांना सोडण्याचे ठिकाण ठरविण्यात आले आहे. दत्तचौक ते वीजय दिवस चौक या परिसरामध्ये नो हॉकर्स बंदी घालण्यात आली आहे.


गेले चार दिवस शहर हातगाडा संघटनेने व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी व हॉकर्स झोन तातडीने निश्चित करण्याच्या मागणीसाठी बसस्थानकावर ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला होता.दरम्यान अतिक्रमण मोहिमेमध्ये ज्या व्यापाऱ्यांचे फलकांचे नुकसान झाले आहे. त्यांनी आपले फलक तयार करून नगरपालिकेचे संमती घ्यावी असे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.सदर हॉकर्स झोन व रिक्षा गेटबाबत प्रस्तावाचा प्राथमिक आराखडा तयार केला असून नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा आयोजित करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल असेही राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.


कृष्णा घाटावर हातगाडे चालकांना व वाहतुकीच्या नियमांना शिस्त लावण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनी सांगितले