जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना संदर्भात कार्यशाळा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सुक्ष्म नियोजन आराखडा होणार तयार


जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना संदर्भात कार्यशाळा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्ह्यात सुक्ष्म नियोजन आराखडा होणार तयार

 सातारा -  कोरोना संसर्गचे रुग्ण  राज्यात पुण्याबरोबर दुसऱ्या जिल्ह्यातही आढळले आहेत. त्यामुळे साताऱ्यात दक्षता पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गबाधीत रुग्ण आढळल्यास त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करावे. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करावी तसेच तो संसर्ग झालेला रुग्ण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीपासून 3 किलो मिटर परिसरात प्रत्येक घराचा सर्व्हे करा कोणी आजारी असल्यास त्याची माहिती तात्काळ आरोग्य विभागाला द्यावी. यासाठी ग्रामीण भागात 50 घरांसाठी व शहरी भागातील 100 घरांसाठी कर्मचाऱ्यांची नेमणुक करावी. यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांनी सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.


 येथील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कोरोना संसर्ग विषयी माहिती व करावयाच्या उपाययोजना या साठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.


 विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयाचा परिसर व कार्यालयातील शौचालयाची स्वच्छता करुन घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, प्रत्येकानी आपल्या स्वच्छतेची काळजी स्वत:च घेतली पाहिजे आज तरी कोरोना संसर्गावर कुठलाही उपचार नाही पण स्वच्छतेच्या जोरावर या संसर्गापासून दूर राहता येईल.


शासकीय कार्यालयांमध्ये होणार उद्या होणार हात धुण्याचे प्रात्यक्षिक  जिल्ह्यातील विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयात हात स्वच्छ धुण्याचे 7 प्रकार प्रत्येक कर्मचाऱ्यांना सांगणे गरजेचे आहे, यासाठी प्रत्येक कार्यालयात उद्या याची प्रात्यक्षिके घ्यावीत. शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येत असतात या नागरिकांना शेकहॅन्ड करायचे टाळून हात जोडून नमस्ते करण्याची सवय लावा. बाहेर देशातून नागरिक प्रवास करुन आला तर त्याची माहिती तात्काळ पोलीस, महसूल व आरोग्य विभागाला द्या यासाठी स्थानिक पातळीवरील यंत्रणा कार्यान्वीत करा.   


 कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी  जिल्ह्यातील यात्रा, महोत्सव तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रम जत्रा, यात्रा यातील गर्दी टाळण्यासाठी  देवस्थानचे पुजारी किंवा मानकरी यांनी विधीवत पुजा करावीत. सर्व हॉटेल, लॉज, ढाबे यामध्ये येणाऱ्या नागरिकांचे बसण्याचे टेबल, नेहमी हाताळणारे मेनूकार्ड, वॉश बेसीन, वॉश बेसीनचे नळ, शौचालय  तसेच ज्या ठिकाणी नागरिकांचा हाताचा स्पर्श होऊन संसर्गजन्य रोगाचा प्रादुभाव वाढण्याची शक्यता आहे, या सर्व बाबी दिवसातून वारंवार निर्जुंतुकीकरण करण्यात यावे. तसेच हायवेलगत राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील येणारे प्रवासी यांची लॉजमध्ये नोंदणी रजिस्टरमध्ये नोंदणी करावी.  कोरोनाबाबत समाज माध्यमांवरुन अनेक अफवावर पसरत आहे या अफावांर विश्वास ठेवू नये यासाठी नागरिकांना विश्वासात घवून दक्षता घेण्याबाबत सांगा, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कार्यशाळेत सांगितले.
     


संसर्ग रुग्ण आढळल्यास तो राहणाऱ्या आसपासच्या घरांचा सर्व्हे करण्यासाठी पथक तयार करण्यात आली आहे. पथकाकडून प्रत्येक घराचा सर्व्हे करुन काही ठराविक प्रश्न विचारण्यात येणार आहेत. कुणी आजारी नागरिक आढळल्यास त्याची माहिती हे पथक तात्काळ आरोग्य विभागाला देईल. कोरोना संसर्गाची माहिती व कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजना यांची सवितस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी कार्यशाळेत सांगितले.


कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी कामाच्या मर्यादा पाळू नका, आपल्या कामाचे विस्तारीकरण करा. एकदा जर संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला प्राथमिक सुविधा द्या. कोरोना संसर्गाबाबत विविध समाज माध्यमांतून अफवा पसरविण्यात येत आहेत हा अपराध आहे. कुणी अफवा पसरवित असल्यास त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी नागरिकांची या कामापुरते शक्य असतील ते कामे ई-मेल, फोन द्वारे करावीत यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यालयीन ई-मेल, दूरध्वनी क्रमांका नागरिकांना द्यावा. तसेच विभाग प्रमुखांनी कार्यालयातील शौचालय तसेच वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू स्वच्छ ठेवाव्यात. कोरोना संसर्ग ही आपत्ती असून या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करु, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्यशाळेत केले.


 याकार्यशाळेत डॉ. सुभाष औंधकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कोरोना संसर्ग व करावयाच्या उपाययोजनांची माहिती  दिली. या कार्यशाळेला सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.