आरती देशमुख यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी साधला संवाद
मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी श्रीमती आरती देशमुख यांनी आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी तसेच महिला पोलिसांशी संवाद साधून आस्थेने विचारपूस केली. साक्षात गृहमंत्र्यांच्या पत्नीच विचारपूस करत आहेत या आश्चर्याच्या धक्क्यातून सावरत या महिलांनी भरभरुन बोलत श्रीमती देशमुख यांचे आभार मानले.
वरळी येथील आयपीएस भोजनालयात (मेस) हा हृदय संवादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीमती सुनीता ठाकरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अखंड कार्यरत राहणारे पोलीस दल राज्याचा अभिमान आहे, असे सांगून श्रीमती देशमुख म्हणाल्या, पोलीस दलातील महिला अधिकारी- कर्मचारी तसेच पुरुष पोलीस त्यांच्या कुटुंबियांच्याही काही समस्या असू शकतात त्या जाणून घेणे महत्त्वाचे वाटले. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना सांगून पोलिसांच्या पत्नींना तसेच महिला पोलिसांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्याचे ठरविले.
यावेळी उपस्थित पोलीस पत्नींनी पोलीस वसाहतीतील निवासस्थानांच्या समस्यांसह विविध समस्या त्यांच्याकडे मांडल्या. त्या गृहमंत्र्यांकडे निश्चितपणे पोहोचवेन, असे आश्वासन श्रीमती देशमुख यांनी त्यांना दिले.