"खड्डेमुक्त - अपघातमुक्त महामार्ग"साठी कृतीचा अवलंब सुरू 


"खड्डेमुक्त - अपघातमुक्त महामार्ग"साठी कृतीचा अवलंब सुरू 


कराड - राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.वारंवार तक्रारी झाल्या. इतकेच काय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रस्ता दुरुस्तीचे आदेश दिल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने यांची गंभीरपणे दखल घेतली असून ‘खड्डेमुक्त महामार्ग, अपघातमुक्त महामार्ग’ करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. रस्ते विकास महामंडळाने याबाबत कृती आराखडा तयार केला असून महामार्गावर दर्जेदार डांबरीकरणाचे काम जलद गतीने सुरू केले आहे. एकही खड्डा कुठे दिसणार नाही याची दखल महामंडळाने घेतली आहे.


पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग पुन्हा स्टार महामार्ग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला असून गेल्या पाच महिन्यात झालेल्या पावसाळ्यात पुणे-सातारा-कराड महामार्गाच्या रस्त्याची चाळण झाली होती. वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. यामध्ये पुणे-सातारा महामार्गावर वाहतुकीची कोणतीही अडचण होऊ नये किंवा वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये, म्हणून राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास महामंडळ, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यंत्रणेने 24 तास वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खड्डेमुक्त महामार्ग करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे- सातारा महामार्ग स्टार महामार्ग होण्यासाठी सज्ज झाला असून महामार्गावर कार्पेट डांबर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 


यामुळे सगळ्यात जलदगतीने महामार्ग करण्याकडे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली आहे. सध्या सातारावरून पुण्याच्या दिशेने सातारा हद्दीतून डांबर कार्पेट महामार्गावर करण्याचे आधुनिक मशीनद्वारे काम सुरू झाले आहे. दर्जेदार काम व सुरक्षित वाहतुकीसाठी महामार्ग खड्डेमुक्त करून त्यावर अत्याधुनिक मशीनद्वारे डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांतच सुस्थितीत दर्जेदार रस्ता वाहनचालकांसाठी उपलब्ध होणार आहे. 


राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर हजारो वाहनांची ये-जा सुरू असते यामुळे अपघात मुक्त महामार्ग करण्याच्या दृष्टीने रस्ते विकास महामंडळाचे प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीला अडथळा येणारी प्रत्येक गोष्ट हटवण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यापासूनच सातारापर्यंत काम सुरू झाले आहे. त्यामुळे आता ‘खड्डेमुक्त महामार्ग आणि अपघात मुक्त महामार्ग’ करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.


जलद गतीने काम सुरू


पुणे-सातारा रस्ता अत्यंत खराब झाला होता. याबाबत अनेक तक्रारी झाल्या मात्र पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर रस्ते विकास महामंडळ खडबडून जागे झाले असून महामार्ग खड्डेमुक्त वस्तुस्थितीत रस्ता करण्यास प्रारंभ झाला आहे.