सातारा जिल्हा आढावा बैठक ......विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


सातारा जिल्हा आढावा बैठक
विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई -  सातारा जिल्ह्यातील जलसिंचनाच्या लहान मोठ्या प्रकल्पांसह रस्ते,पाणीपुरवठा, आरोग्य, शहरांची हद्दवाढ आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला.


मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह, वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता आणि पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे,जयकुमार गोरे, मुख्य सचिव अजोय महेता यांच्यासह सर्व संबंधित विभागाच्या सचिवांची उपस्थित होते. यावेळी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील प्रलंबित कामांसह विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या.


उरमोडी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करुन दुष्काळाचा सामना करण्यात आला आहे. यामुळे या प्रकल्पाचे माणखटाव या भागातील 31 किलोमिटर वितरण प्रणालीचे काम तत्काळ पुर्ण करण्यात यावे. तसेच मंजूर प्रकल्पांच्या कामांची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन पावसाळ्याच्या आधी कार्यारंभ आदेश देवून कामांना प्रत्यक्षात सुरुवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.


श्री.ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे करावीत, असे केल्यास निधीचे योग्य नियोजन करता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील इतर विकासकामांकरिता पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून निधीचे योग्य नियोजन करुन कामे करावीत.


सातारा जिल्ह्यात नवीन एमआयडीसी सुरु करतांना ज्या ठिकाणी उद्योग व्यवसाय येण्यास उत्सुक आहेत. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच रोजगार उपलब्ध होवू शकेल. अशा ठिकाणास प्राधान्य देवून भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.