मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा पत्राने मंत्रालयातल्या महिला कर्मचाऱ्यांना सुखद धक्का


मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा पत्राने मंत्रालयातल्या महिला कर्मचाऱ्यांना सुखद धक्का


मुंबई,  : आज मंत्रालयात येणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेव्हा अगत्यपूर्वक गुलाब फुले आणि एक पत्र देऊन त्यांचे स्वागत केले जात होते तेव्हा त्यांना एक सुखद धक्का बसत होता. हे स्वागत मुख्यमंत्री सचिवालयाचे कर्मचारी पारंपरिक वेशात हसतमुखाने शुभेच्छा देऊन करीत होते आणि पत्र होते खुद्द मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे !! आणि विषय होता ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाचा.


 या अनोख्या स्वागताने भारावून गेलेल्या महिला अधिकारी व कर्मचारी मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन भेटेल त्याला दाखवीत होत्या तर अनेक जणींनी स्मार्ट फोनमधून या पत्राचा फोटो आपल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना पाठवून आपला आनंद द्विगुणित केला.


काय लिहिले आहे या पत्रात ?


या पत्रात असे म्हटले आहे की, आपण महिला रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुलगी, पत्नी, आई, अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतांनाच मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान देत असता, तुमच्या सहकाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांची यशस्वीपणे अंमलबजावणी करू शकतो.


महिलांनी व्यक्त केला आनंद


आपली प्रतिक्रिया देतांना एक अधिकारी निशिगंधा कुवळेकर म्हणाल्या की, नेहमीप्रमाणे आमच्यापैकी प्रत्येक जणी ट्रेनमधून उतरल्या की पंचिंग साठी धावत असतात. वेळेवर हजेरी लागली म्हणजे ट्रेनची गर्दी, जेवणाचा डब्बा, घरच सर्व आवरुन येताना.. मस्टरची घाई.. एकदाच पंच (हजेरी) झाली की धावाधाव सत्कारणी लागते.


आज मंत्रालयात आले आणि प्रवेशव्दारातच प्रत्येक महिला कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प व मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र देऊन हसून स्वागत झाले. आपण स्वप्नात तर नाहीना असे वाटावे एव्हढे प्रेमळ स्वागत होते. मी माझ्या ३२ वर्षांच्या सरकारी नोकरीत माणूसकीचा ओलावा, आपुलकी पहिल्यांदाच अनुभवत होते.


तन्वी सावंत म्हणाल्या की, शिवछत्रपतींच्या आदर्शाची नुसती पोकळ घोषणाबाजीच नाही तर ती आचरणातही आणण्याचा सीएम साहेबांचा संकल्प कौतुकास पात्र आहे.


जोत्स्ना कोकितकर म्हणाल्या की, मंत्रालयात धावत धावत येत असतांना रस्त्यापर्यंत  रांग दिसली. थोडेसे त्रासल्यासारखे झाले पण जेव्हा ही रांग आमचे कौतूक करण्यासाठी आहे असे कळले तेव्हा या आपलेपणाने भारावून गेले. संजना खोपडे म्हणाल्या की, फ़ाईली, कार्यालयीन आदेशांच्या कोरडेपणापलीकडे आयाबहिणींना दिलेला आपलेपणा मनाला भावून गेला.


गीता आंबेडकर म्हणाल्या की, पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. आम्हाला काम करण्याची उर्जा मिळाली. आपण जी धडपड करतो ती सार्थकी लागली. संगीता गुल्हाने  म्हणाल्या की, या पत्राने समाधान वाटले आणि आपली दखल एवढ्या सर्वोच्च व्यक्तीने घ्यावी याचा आनंद झाला, धन्यवाद सीएम सर. मुख्यमंत्र्यांनी जी प्रशंसा केली त्यामुळे अधिक काम करण्याची उर्जा मिळाली असे रत्ना नाईक यांनी आनंद व्यक्त करतांना सांगितले.