कराडमधील हॉकर्स झोनचा प्रश्‍न कधी सुटणार ? हातगाडे चालकांचे ठिय्या आंदोलन सुरू


कराडमधील हॉकर्स झोनचा प्रश्‍न कधी सुटणार ?
हातगाडे चालकांचे ठिय्या आंदोलन सुरू


कराड - कराड नगरपालिकेने राबवलेली अतिक्रमण हटाव विरोधी मोहीम यशस्वी झाली. मात्र हॉकर्स झोनबाबत नगरपालिकेचा निर्णय होईना यामुळे हातावरील पोट असणारे छोटे व्यवसायिक ठिय्या आंदोलन करीत आहेत. सुमारे एक तप उलटले तरी कराडमधील हॉकर्स झोनचा प्रश्‍न निकाली लागला नाही. नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. अन्यथा जनसामान्यांचा यातून उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


2009 मध्ये उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना हॉकर्स झोन द्यावेत व योग्य ठिकाणी त्यांचे पुनर्वसन व्हावे असा निकाल दिला होता. त्यावरून हॉकर्स संघटनेने नगरपालिकेस याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार 2014 मध्ये पालिकेकडून सर्व्हे झाला. त्यानंतर फेरीवाल्यांना ओळखपत्र द्यायचे, हॉकर्स झोनची निर्मिती करायची असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र वारंवार मागणी करूनही नगरपालिकेने त्यानंतर याची दखल घेतली नाही. अतिक्रमण हटाव मोहिमेत बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवल्यानंतर हातगाडे, फेरीवाल्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा दाद मागूनही योग्य मार्ग निघत नसल्याने व्यावसायिकांच्या कुटुंबाचे हाल होत आहेत. 


गतवर्षी नगरपालिकेने हॉकर्स झोनसाठी सुचवलेल्या जागेस विरोध केल्यामुळे पुन्हा हॉकर्स झोनचा प्रश्‍न जैसे थे राहिला आहे. नगरपालिका वाहतूकीस अडथळा ठरत असलेले हातगाडे उचलून नेत आहेत. गतवर्षी संघटनेने नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले. आता पुन्हा ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये कराड नगरपालिकेने आरक्षित असलेल्या पार्किंग जागेवरील अतिक्रमण दूर केले आहे. कराड बस स्थानकाच्या समोरच हे पार्किंग असल्यामुळे या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात हॉकर्स झोनच्या धरतीवर हातगाडे चालकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. 


दरम्यान हातगाड्यांची संख्या व जागेचे क्षेत्रफळ पहाता एका ठिकाणीतात्पुरते पुनर्वसन होत नसल्यामुळे बसस्थानकला लागून असणाऱ्या भिंतीलगत हातगाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी होत नसल्याने अखेर हातगाडा चालक संघटनेने ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेऊन दहा मार्चपासून आंदोलनास सुरुवात केली. बसस्थानक परिसरातील हातगाडा तसेच अन्य विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी योग्य जागा देणे आवश्यक आहे. अतिक्रमण मोहिमेमुळे व्यावसायिकांच्यावर उपासमारीची वेळ आली असून नगरपालिका केव्हा जागा देते याकडे व्यावसायिकांचे डोळे लागले आहेत. 


हॉकर्स झोनबाबत संशयास्पद भूमिका ?


काही नगरसेवक धनाढ्य व्यापाऱ्यांचे बोर्डाचे नुकसान झाल्याची चर्चा करून राजकारण करतात. मात्र हातावर पोट असणाऱ्या हातगाडे चालकांना गेल्या पंधरा दिवसापासून वाऱ्यावर सोडले आहे. याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. दरम्यान काही नगरसेवकांची संशयास्पद भूमिका असल्यामुळे हॉकर्स झोनचा प्रश्न लोंबकळत पडला आहे.