मलकापूर शहरामध्ये पुणे, मुंबई व इतर शहरातून येणार्‍या नागरिकांनी...स्वतः ची माहिती नगरपरिषदेकडे द्यावी


मलकापूर शहरामध्ये पुणे, मुंबई व इतर शहरातून येणार्‍या नागरिकांनी...स्वतः ची माहिती नगरपरिषदेकडे द्यावी


कराड  - सध्या करोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, यावर तात्काळ उपाययोजना व्हावी व याचा फैलाव रोखणेसाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये नागरिकांना वैयक्तिक स्तरावर काळजी घेणे व स्वतः च्या आरोग्याची माहिती तातडीने आरोग्य विभाग व नगरपरिषद यांचेकडे देणेविषयी जनजागृती करणेत आली आहे. तसेच याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांचेकडून माहिती प्रसिध्द करणेत आली आहे. 


मलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीत या विषाणुंचा फैलाव होऊ नये याकरिता घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्या विषयी सर्व बाबी सर्व्हेक्षण मलकापूर नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनिस, जिल्हा परिषद शाळा शिक्षक, खाजगी विद्यालयातील शिक्षक यांच्या सहकार्याने करणेत आले आहे. यामध्ये सध्या सद्यपरिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद व्यक्ती आढळून आलेले नाहीत. तसेच नगरपरिषदेने दि. 21/03/2020 रोजी सर्व डॉक्टरांची बैठक आयोजित करुन, संभाव्य उपाय योजनांबाबत माहिती देणेत आली असून, नगरपरिषदेकडे सर्व्हेक्षणाद्वारे उपलब्ध झालेली माहिती संबंधित डॉक्टरांना अवगत केली आहे. तथापि, राज्य शासनाने दि. 31 मार्च 2020 अखेर सार्वजनिक सुट्टी जाहिर केली असून, 1ली ते 8वी च्या परिक्षा रद्द करुन उर्वरित परिक्षांच्या वेळेत बदल केलेला आहे. 


तसेच दि. 31 मार्च, 2020 पर्यंत बंद सुद्धा केली असून, दि. 25 मार्च, 2020 गुढीपाडवा सनानिमित्त मलकापूर शहरामध्ये पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक व इतर शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत. त्यामुळे वेळीच उपाययोजना होणे गरजेचे असलेने जे नागरिक मलकापूर शहरामध्ये येणार आहेत किंवा आलेले आहेत त्यांनी तातडीने आपली माहिती महाराष्ट्र शासन आरोग्य व नगरपरिषद आरोग्य विभाग यांचेकडे तात्काळ सादर करावी. यामध्ये प्रामुख्याने नाव, पत्ता, वय, कोणत्या शहरातून आला त्या शहराचे नाव, व्यक्तींची संख्या, मोबाईल नंबर, सध्या काही आरोग्याची तक्रार असल्यास याबाबतची माहिती सादर करावी. याकरिता शासनाने कोड दिला असून सदर कोड स्कनिंग करुन याबाबतची माहिती ऑनलाईन भरु शकता.


सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व करोना विषाणुचा फैलाव रोखणेसाठी सदरची माहिती अत्यंत आवश्यक असलेमुळे नागरिकांनी वेळीच याबाबतची माहिती द्यावी. मलकापूर शहरातील सर्व नागरिकांना विनंती की, त्यांनी आपल्या घराशेजारील बाहेरुन आलेल्या व्यक्तींची माहिती संबंधित विभागातील नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषद कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनिस व शिक्षक यांना कळवावी. याकरिता नगरपरिषदेचा संपर्क क्र. 02164-241535, 241325 तसेच टोल फ्री क्रमांक 18002331323 यावर द्यावा. जे नागरिक स्वतःहून याबाबतची माहिती देणार नाहीत, त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कायदेशिर कारवाई करणेत येईल. असे आवाहन सौ. निलम धनंजय येडगे, नगराध्यक्षा, श्री. मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष तथा सभापती, पाणीपुरवठा सार्व. आरोग्य व जलनिस्सारण समिती, श्रीमती संजीवनी दळवी, मुख्याधिकारी यांनी केले आहे