डाकवेवाडीची शाळा पाटण तालुक्यात ‘अव्वल’
कराड - सातारा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ सुंदर गुणवत्तापूर्ण उपक्रमशील स्पर्धेत 2019-20 मध्ये जास्तीत जास्त गुण पटकावत डाकवेवाडी शाळेने प्रथम क्रमांक मिळवला आहे. पाटणचे गटशिक्षणअधिकारी नितीन जगताप यांनी या शाळेला प्रत्यक्ष भेट देवून शाळेचे, शिक्षकांचे, विद्याथ्र्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले आहे. यामुळे शाळेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पाटण तालुक्यातील काळगांव केंद्रात डाकेवाडी ही अतिशय दुर्गम भागातील शाळा आहे. अनेक भौतिक सोयीसुविधांपासून ही शाळा वंचीत असली तरी सुरुवातीपासूनच गुणवत्तेच्या बाबतीत ही शाळा अग्रेसर आहे. क्रीडा स्पर्धेतही तालुक्यातील अनेक पारितोषिके या शाळेने आपल्या नावावर केली आहेत. इ.1 ली ते 4 थी पर्यंत असणा-या या शाळेत एकूण 29 मुले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक महादेव गेजगे व उपशिक्षक रणजित शिंदे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले आहे.
अव्वल ठरण्यापूर्वी ही शाळा रंगकामाविना ओबडधोबड दिसत होती. परंतू यावर नुकत्याच रेखाटलेल्या चित्रांमुळे ही शाळा अक्षरशः सजून गेली आहे. डाकेवाडीतील स्पंदन चॅरिटेबल टस्ट चे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांच्या विशेष संकल्पनेतून या शाळेचे बाहयरुप पालटून गेले. चित्रकार संदीप डाकवे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकार प्रीतीराज पाचुपते, भगवान जाधव, दिनेश देसाई यांनी जीव ओतून या ठिकाणी काम केले. आणि शाळेला अक्षरशः सजीव केले. त्यांच्या कलाविष्काराने शाळेचे रुपडेच पालटून गेले. गटशिक्षणाधिकारी नितीन जगताप यांनीदेखील याचे कौतुक केले. सदर काम हे लोकसहभागातून झाल्याने शिक्षकांनादेखील समाधान वाटत आहे.
लोकसहभागातून नटलेल्या व गुणवत्तेमध्ये अव्वल ठरलेल्या या शाळेसाठी सरपंच सौ.रेश्मा डाकवे, माजी सरपंच अनिल डाकवे, उपसरपंच तुकाराम डाकवे, मोहन डाकवे, शत्रुघ्न डाकवे, पोलीस पाटील अवधूत डाकवे, शिवछत्रपती प्रतिष्ठान ग्रुप, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आशाताई मस्कर, शाळाव्यवस्थापन समितीचे इतर सदस्य, डाकेवाडीतील महिला यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले.
डाकेवाडी शाळेने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पंचायत समिती पाटणच्यावतीने शाळेचे मुख्याध्यापक महादेव गेजगे यांचा सन्मानपत्र देवून नुकताच सत्कार करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी नितीन जगताप, ग्रामविस्तारधिकारी प्रशांत आरबाळे, केंद्रप्रमुख पंढरीनाथ साळुंखे आदींनी शाळेचे कौतुक केेले आहे.
लोकसहभाग असेल तर काय होवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी शाळा. लोकसहभागामुळेच आज माझ्या शाळेचा कायापालट होत आहे. मुलांना शिक्षण देण्याच्या बाबतीत आम्ही अजिबात कमी पडत नाही. लोकांनी शाळेला केलेल्या सहकार्यामुळेच आज माझी शाळा पाटण तालुक्यात अव्वल ठरली आहे. याचा मला अभिमान वाटत आहे.
महादेव गेजगे, मुख्याध्यापक, जि.प.प्राथ.शाळा डाकेवाडी