कराड महिला महोत्सवाचे आयोजन -  स्मिता हुलवान 


कराड महिला महोत्सवाचे आयोजन -  स्मिता हुलवान 


कराड - महिलांना उद्योजिका म्हणून समाजात काम करता यावे, त्याचबरोबर महिलांची आर्थिक उन्नती व्हावी. यासाठी महिलांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून कराड नगरपरिषद, महिला व बालकल्याण समितीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सात व आठ मार्च रोजी कराड महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सभापती स्मिता हुलवान यांनी दिली.


महिला व बालकल्याण समितीच्यावतीने दीनदयाळ अंत्योदय योजना अभियान, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, राबविण्यात येणार असून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 7 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महिला बचत गट स्टॉलचे उद्घाटन, सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबिर, महिलांना पॅनकार्ड, उद्योग आधार, शॉप ॲक्ट, अन्न भेसळ परवाना व कागदपत्रे, महिला बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्र वितरित करणे. बचत गटांना फिरता निधीच्या धनादेशाचे वितरण करणे वस्ती स्तर संघाचे फिरता निधीच्या धनादेशाचे वितरण करणे, वस्तीस्तर संघाचे फिरता निधीच्या धनादेशाचे वितरण करणे, दिव्यांग ऑडिओ लायब्ररी उद्घाटन करणे, दिव्यांग कल्याण अनुदान वितरण करणे, उद्योग, कर्ज बँकेची भूमिका, पंतप्रधान जीवन सुरक्षा, ज्योती विमा, मुद्रा, अटल पेन्शन योजना याबाबत माहिती देण्यात येणार आहे.


त्याचबरोबर ८ मार्च रोजी सकाळी दहा वाजता खास महिलांसाठी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अशीही माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मिता हुलवान यांनी दिली असून सदर कार्यक्रमास महिलांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.