कृष्णा बँकेला 11 कोटी 95 लाखांचा ढोबळ नफा... डॉ. अतुल भोसले यांची माहिती; अ554 कोटी रूपयांहून अधिक एकूण व्यवसाय


कृष्णा बँकेला 11 कोटी 95 लाखांचा ढोबळ नफा... डॉ. अतुल भोसले यांची माहिती; अ554 कोटी रूपयांहून अधिक एकूण व्यवसाय


कराड : येथील कृष्णा सहकारी बँकेला सन 2019-20 या आर्थिक वर्षात 11 कोटी 95 लाख 32 हजार रूपये एवढा ढोबळ नफा झाला असून, बँकेने 554 कोटी रूपयांहून अधिक एकूण व्यवसाय केला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.


याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे यासाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेच्या 31 मार्च 2020 अखेरच्या एकूण ठेवी 353 कोटी रूपयांच्या असून, 201 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 554 कोटींच्या वर झाला असून, निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के राखण्यात बँक यशस्वी झाली आहे. सर्व तरतुदी व कर वजा जाता बँकेेने 4 कोटी 28 लाख एवढा निव्वळ नफा कमाविला आहे      


देशातील आर्थिक मंदीसदृश्य स्थिती आणि सध्या जगभरात वेगाने फैलावन असलेल्या कोराना साथीच्या पार्श्‍वभूमीवरही बँकेने सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेदार व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करत व्यवसाय वृद्धीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. बँकेने ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम सुविधा, एस.एम.एस. बँकींग, ई-कॉमर्स, आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी., एन.ए.सी.एच्., लॉकर्स यासारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू केल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या 4 जिल्ह्यात 19 शाखांच्या माध्यमातून विनम्र व तत्पर सेवा देणार्‍या या बँकेने सुरू केलेल्या एटीएम सेवेचा लाभही ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा तसेच अन्य सुविधांचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे.


महाराष्ट्रव्यापी कार्यक्षेत्रासाठी प्रयत्न


सध्या सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या 4 जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कृष्णा सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे मागणी करणार असल्याची माहिती चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.