लॉकडाऊन काळात समाज माध्यमाद्वारे......खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 113 गुन्हे दाखल...महाराष्ट्र सायबरची कार्यवाही


लॉकडाऊन काळात समाज माध्यमाद्वारे......खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 113 गुन्हे दाखल...महाराष्ट्र सायबरची कार्यवाही


 मुंबई, - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलली असून राज्यात समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी समाज माध्यम बाबत अधिक सतर्क राहून महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे असे आवाहन   विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्यावतीने करण्यात येत आहे. 


या गुन्हेगारांना व समाजकंटकांवर  गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर  सायबर विभाग समन्वय साधून काम करत आहे. या करिता विभाग  टिकटॉक ,फेसबुक , ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांवर अचूक लक्ष ठेवून आहे. 


    राज्यातील गुन्ह्यांची आकडेवारी


महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  6 एप्रिल 2020 पर्यंत 113  गुन्हे दाखल झाले आहेत .त्यामध्ये बीड 15, पुणे ग्रामीण 11, मुंबई 9, सातारा 7, जळगाव 7 , नाशिक ग्रामीण 6 , नागपूर शहर 4 ,नाशिक शहर 4, ठाणे शहर 4, नांदेड 4, गोंदिया 3, भंडारा 3 , रत्नागिरी 3, जालना 3, परभणी 2, अमरावती 2, नंदुरबार 2, लातूर 1, नवीमुंबई 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे .


          बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल  गुन्ह्यांमध्ये आरोपींनी फेसबुक किंवा व्हाट्सअँप वर पोस्ट टाकून किंवा शेअर करून त्याद्वारे कोरोना महामारीला जातीय रंग देऊन, त्या द्वारे धार्मिक तेढ व समाजात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.अशाच प्रकारच्या  एका गुन्ह्याची नोंद लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली. सदर आरोपी ने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकली, ज्यामुळे त्या परिसरात अशांतंता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो .


धार्मिक भावना दुखावणारे मजकूर फॉरवर्ड न करण्याचे आवाहन


   महाराष्ट्र सायबर मार्फत असे आवाहन करण्यात येते की, जर आपणास कोणी अपरिचित व्यक्तीने किंवा आपण ज्या व्हाट्सॲप ग्रुपवर आहात त्यावर कोणी परिचित , अपरिचित व्यक्तीने असे व्हिडिओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे मेसेज पाठवत असेल , तर लगेच त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये द्यावी .तसेच आपण असे व्हिडिओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स कोणालाही पाठवू नयेत व त्वरित काढून टाकावी.


    आपण जर  व्हाट्सॲप ग्रुपचे निर्माते , ॲडमिन असाल तर चुकीच्या पोस्ट्स अथवा अफवा पसरवणारे मेसेजेस व व्हिडिओ ग्रुपवर येणार नाहीत याची खबरदारी घेणे तुमचे कर्तव्य आहे. तसे न केल्यास तुमच्यावर पण गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यासाठी आपण group सेटिंग मध्ये only admin असे setting करावे.


    सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या तक्रारी संपर्क साधावा


   महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉटसअप किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत. तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशन कडे संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची  माहिती www.cybercrime.gov.in वर पाठवावी. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे.