कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यात 144 कलम लागू

 


कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यात 144 कलम लागू


सातारा -   सातारा जिल्हयातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणेचे अनुषंगाने सातारा जिल्हयात यापुढेही क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदी लागू ठेवणे आवश्यक आहे, जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार   प्राप्त असलेल्या अधिकारान्वये 20 एप्रिल 2020 रोजीच्या सायंकाळी 6 वाजल्या पासून ते  पुढील आदेश होईपर्यंत सातारा जिल्हयात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस मनाई करण्यात आली आहे.


  दुय्यम निबंधक कार्यालये हे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.  हे प्रतिबंधात्मक आदेश पुढील बाबींना लागू राहणार नाहीत.  सर्व बँका व वित्तीय सेवा व तदसंबंधीत आस्थापना. अन्न दूध, फळे व भाजीपाला, किराणा, पुरविणा-या आस्थापना, खते, बियाणे, औषधे, कृषी यंत्रे अवजारे, ट्रॅक्टर उपकरणे व त्यांची दुरुस्ती, स्पेअरपार्ट, स्प्रे पंप, सिंचन साहित्य, पाईप,  ठिबक/तुषार सिंचन, शेततळे अस्तरीकरणाचे कागद इत्यादी संबंधी दुकाने/निर्मिती, वाहतूक,  दुरुस्ती., तसेच मटण, चिकन व मासे हे न शिजवलेल्या स्वरुपात मागणीप्रमाणे घरपोच देता येतील.  दवाखाने, वैद्यकीय केंद व औषधी दुकाने व तदसंबंधीत आस्थापना, प्रसार माध्यमे , मिडीया व तदसंबंधीत आस्थापना चालू राहतील तथापि पेपरचे घरपोच वाटप बंद राहील. दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना , मोबाईल  कंपनी टॉवर व तदसंबंधीत आस्थापना. विदयूत पुरवठा , ऑईल व पेट्रोलीयम व उर्जा संसाधने व तदसंबंधीत आस्थापना. पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा करणा-या आस्थापना व वरील सर्व आस्थापनांसाठी अत्यावश्यक असणारे वेअर हाऊस, शासकीय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, पाणी टंचाई तसेच पावसाळा पुर्व अत्यावश्यक शासकीय कामे यांना प्राधान्य  राहील.  पशूखाद्य निर्मिती करणारे कारखाने.  संबंधीत आयटी आणि आयटीईएस आस्थापना (कमीत कमी मनुष्य बळाव्दारे) अत्यावश्यक सेवा संबंधीत वस्तू आणि मनुष्यबळ , वाहतूक करणारे ट्रक / वाहन (आवश्यक स्टिकर  लावलेले )


जिल्हयातील सर्व औदयोगिक क्षेत्र तसेच औदयोगिक क्षेत्राव्यतिरिक्त मोठे उदयोग, आस्थापना व कारखाने याबाबत शासन परिपत्रक क्रमांक नं.डीआय/कोरोना-19/2020/ बी 6343 डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज, मुंबई दि. 20/04/2020 अन्वये यापुर्वी दिलेल्या सर्व परवानग्या वैध राहतील. तसेच नवीन शासन आदेशाप्रमाणे औदयोगिक आस्थापनांना परवानगी देणेबाबत या कार्यालयाकडील आदेश क्र. क्र.नैआ/कावि/1024/2020  दि.20/04/2020  अन्वये आदेश निर्गमित करणेत आला असून त्याप्रमाणे कार्यवाही करावी.  खाजगी बांधकाम परवानगीबाबत या कार्यालयाकडील आदेश क्र.नैआ/कावि/1025/2020 दि.20/04/2020  अन्वये आदेश निर्गमित करण्यात आला असून त्याप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.


महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळ तसेच सर्व खाजगी बसेस बंद राहतील . तथापि प्रशासकीय , वैदयकीय सेवा पुरविणा-या व कोरोना नियंत्रणासाठी काम करणा-या शासकीय व खाजगी  व्यक्तींची वहातूक करणेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना सूट राहील. तथापि यासाठी संबंधीताची ओळखपत्राची तपासणी करणे बंधनकारक राहील.


कोणत्याही व्यक्तीला सातारा जिल्हयातील कोणत्याही रस्त्यावर गल्लोगल्ली याठिकाणी सायकल तसेच पारंपारिक, अपारंपारिक इंधनावर चालणा-या मोटर सायकल, (गियरसह, गियर शिवाय), सर्व प्रकारची तीन चाकी / चार चाकी वाहने , हलकी वाहने , मध्यम वजनाची वाहने यांचा प्रवास व वहातूक यासाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली असून पुढील लोकांना सूट देण्यात येत आहे.अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी, कोरोना नियंत्रणासाठी  कार्यरत असणारे अधिकारी / कर्मचारी,  करोना नियंत्रणासाठी काम करणा-या खाजगी आस्थापना व कर्मचारी,  वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या व्यक्ती व अत्यावश्यक सेवा सुविधा देण्यासाठी आवश्यक असणा-या व्यक्ती हे   वगळून (तथापि  वैद्यकीय उपचारासाठी गाडीमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त  एक व्यक्ती यांनाच प्रवास देय राहील.) तसेच वैदयकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर, नर्स, सायंटिस्ट, पॅरामेडीकल स्टाफ, लॅब  टेक्निशियन व इतर आवश्यक असणारा कर्मचारी  वर्ग यांना सर्व प्रकारचा प्रवास अनुज्ञेय राहील.


तसेच सातारा जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय जागा व सर्व खाजगी जागा (जेथे सामान्य माणसांचा वावर आहे) अशा कोणत्याही ठिकाणी थूंकणेस मनाई करणेत येत आहे आणि कोणीही व्यक्ती थुंकल्यास त्यास 1000/- रु दंड आकारण्यात येईल व हा दंड ती जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये  असेल त्यांचेकडे जमा करावा लागेल किंवा हा दंड त्या स्थानिक स्वराज्य संस्थेस वसूल करावा लागेल.   तसेच जिल्हयातील सर्व  धार्मिक स्थळे या आदेशान्वये बंद करण्यात येत आहेत. तसेच या जिल्हयाची हद्द  ही वाहनांच्या वाहतूकीसाठी इतर जिल्हयासाठी बंद करण्यात येत आहे. तसेच सातारा जिल्हयात सर्व व्यक्तींना नाक व तोंडास मास्क न लावता घरातून बाहेर पडणेस सक्त मनाई करणेत येत आहे.


 तसेच पोलीस अधिक्षक यांनी पूर्ण जिल्हयात विनाकारण अनावश्यकपणे  वावरणा-या व्यक्तींवर योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेऊन नियंत्रण ठेवावे. जिल्हयातील जीवनावश्यक वस्तूंची अवैध साठेबाजी व काळाबाजारी होणार नाही याची दक्षता पोलीस विभाग, पुरवठा विभाग, अन्न व औषध विभाग यांनी घ्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.