मलकापूर नगरपरिषद कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने गरजु लोकांना धान्य वाटप 


मलकापूर नगरपरिषद कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने गरजु लोकांना धान्य वाटप 


कराड - सध्या भारतामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी मा. प्रधानमंत्री व मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये शासनाने उपाययोजना म्हणून दि. 14/04/2020 पर्यंत लॉकडाऊन केले असून, संचारबंदी लागु केलेली आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये फक्त सार्वजनिक अत्यावश्यक सेवा यामध्ये किराणा, भाजी पाला, दुध व औषध दुकाने सुरु ठेवणेत आलेली आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही आस्थापना लॉकडाऊनमुळे बंद असलेने रोजंदारी करणाऱ्या मजुरांना धान्याचा तुटवडा पडून, त्यांच्या जीवनमानावर याचा परिणाम होत आहे. 


याबाबीचा विचार विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांचे कोव्हीड/19/186/2020, दि.03/04/2020 आदेशान्वये मलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषदेच्यावतीने व सामाजिक सेवाभावी संस्था, सर्व्हे इंडिया मिनिस्ट्रीज, तामीळनाडू व समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने शहरामधील रोजंदारी करणाऱ्या मजुरांना यामध्ये घरगुती धुणे भांडी करणाऱ्या महिला, शेत मजुर, गवंड्‌यांच्या हाताखाली काम करणारे मजुर, गवंडी व सेंट्रींग काम करणारे मजुर ज्यांच्याकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही अशा लोकांना जीवनावश्यक वस्तु पुरवठा करणेचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी नगरपरिषदेच्या 9 प्रभागामधून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व्हे करुन 2300 नावे निश्चित केली आहेत. या सर्व नागरिकांना आटा-5 किलो, तांदुळ-3 किलो, चटणी-1 किलो, साखर-1 किलो, तेल-1 लिटर, चहा-पावडर-250 ग्रॅम, तुरडाळ-2 किलो, मीठ-1 किलो, रवा-1 किलो, साबन-1, बिस्कीट पुडा-1, कांदा-1 किलो, बटाटा-1 किलो याचे एकत्रित किट करुन प्राथमिक स्वरुपात वितरण आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. श्री. उत्तम दिगे, उपविभागीय अधिकारी, कराड, मा. श्री. अमरदिप वाकडे, तहसिलदार कराड यांचेहस्ते व मा. सौ. निलम येडगे, नगराध्यक्षा, मलकापूर नगरपरिषद, मा. श्री. मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष, मलकापूर नगरपरिषद, श्रीमती संजीवनी दळवी, मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद, मा. श्री. राजेंद्र यादव, सभापती बांधकाम समिती, सौ. आनंदी शिंदे, सभापती महिला व बालकल्याण समिती, सौ. कमलताई कुराडे, उपसभापती महिला व बालकल्याण समिती, नगरसेविका सौ. शकुंतला शिंगण, सौ. अलका जगदाळे, सौ. नंदा भोसले, सौ. गितांजली पाटील, सौ. भारती पाटील, सौ. पुजा चव्हाण, सौ. स्वाती तुपे, श्रीमती माधुरी पवार, सौ. निर्मला काशिद, सौ. नुरजहाँ मुल्ला, नगरसेवक श्री. अजित थोरात, श्री. आनंदराव सुतार, श्री. सागर जाधव, श्री. प्रशांत चांदे, श्री.आबासाहेब सोळवंडे, श्री. विक्रम रैनाक, माजी नगरसेवक श्री. शंकरराव चांदे, गावकामगार तलाळी श्री. सचिन निकम यांचे प्रमुख उपस्थितीत वितरण करणेत आले. 


याप्रसंगी मा. आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी मत व्यक्त केले की, मलकापूर नगरपरिषदेने शासनाच्या पुढे जाऊन सामाजिक बांधिलकी ठेवून धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप गरजु लोकांना केले आहे. शासनाच्या माध्यमातून सर्व स्तरावर शासकीय यंत्रणा काम करत आहेत. शासनाने आरोग्य विभागातील डॉक्टर व इतर सेवक यांना विमा सरक्षण दिले आहे. त्यामध्ये नगरपरिषदेमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश व्हावा व सदर कर्मचाऱ्यांना काही धोका निर्माण झालेस त्यांच्या कुटुंबियांना मदत व्हावी याकरिता या कर्मचाऱ्यांचा विमा शासनातर्फे काढणेसाठी मी प्रयत्नशिल राहणार आहे. तसेच मलकापूर शहरासाठी कुटीर रुग्णालय लवकरात लवकर व्हावे यासाठी सुद्धा सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच मलकापूर व कराड शहरामध्ये शिव भोजण थाळी सुरु करणेबाबत मा.जिल्हाधिकारी यांना पत्र दिले असून मलकापूर शहरामध्ये शहराच्या पुर्व व पश्चिम बाजुस ते सुरु व्हावे याबाबत मा.तहसिलदार श्री. अमरदिप वाकडे यांना सुचित केले.


मलकापूर नगरपरिषदेने 3 टप्पे केले असून, पहिल्या टप्प्यात धुणे भांडी करणाऱ्या महिला, शेत मजुर, बांधकाम मजुर व इतर गरजु व रोजंदार करणाऱ्या 1000 कुटुंबांना पहिल्या टप्यात धान्याचे वितरण मलकापूर नगरपरिषदेचेवतीने घरोघरी जाऊन करणेत येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीमधील 495 कुटुंबांना पहिल्या टप्यात वाटप करणेत येणार आहे. नगरपरिषदेने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव विचारात घेता सामाजिक अंतर ठेवून मर्यादित स्वरुपात आगाशिवनगर जलशुद्धीकरण केंद्र, नुतन मराठी प्राथमिक शाळा, लक्ष्मीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व शास्त्रीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी प्राथमिक स्वरुपात वाटप घेणेत आलेले आहे. उर्वरित 1300 लोकांना टप्पा क्र. 2 व 3 दि. 15 एप्रिल, 2020 पर्यंत धान्याचे वाटप पुर्ण करणेत येणार आहे. 


यावेळी श्री. मनोहर शिंदे यांनी मलकापूर नगरपरिषदेने संपुर्ण शहराचा प्रभागनिहाय सर्व्हे करुन घेतला असून, पहिल्या टप्प्यामध्ये 1000 लोकांना जीवनावश्यक वस्तुंचे किट प्राथमिक स्वरुपात प्रत्येक प्रभागातील 5 व्यक्तींना आज वाटप करत आहोत. उर्वरित सर्व लोकांना घरपोच किट वाटप केले जाईल. टप्पा क्र. 2 मध्ये 1000 लोकांना व टप्पा क्र. 3 मध्ये 300 अशा एकूण 2300 लोकांना वाटप केले जाणार आहे. त्यासर्व लोकांना किट 15 एप्रिल पर्यंत घरपोच करुन पोहोच देणेचे नियोजन आहे. यामध्ये सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक/नगरसेविका, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच मलकापूर नगरपरिषदेची स्थापन 05/04/2008 रोजी झाली असून, आज 12वा वर्धापन दिन असून त्याचे औचित्य साधून जीवनावश्यक वस्तु किट वापट करणेत आले आहे. मलकापूर नगरपरिषद तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे.