नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप


नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप


कराड - काम करतानाही कौतूकाची थाप महत्वाची असते. त्यामुळे आमचा ऊत्साह व्दिगुणीत होतो. अशीच साथ राहिली तर कराड नक्कीच अव्वल राहिल, अशी भावना नगरपालिका कर्मचारी राम भिसे यांनी व्यक्त केली.


म्हारूगडेवाडी येथील कोरोनाबाधीत रूग्णावर अत्यंसंस्कार करणाऱ्या पालिकेच्या सहा कर्मचाऱ्यासह त्यावेळी रूग्णवाहिका उपलब्ध करून देणाऱ्यांचा सत्कार लोकशाही आघाडीने त्यांच्या दालनात केला. यावेळी कर्मचाऱ्यातर्फे भिसे यांनी मत व्यक्त केले. श्री राम भिसे यांच्यासह मनोज गायकवाड, पराशूराम अवघडे, योगेश कांबळे, भगवान ढेकळे, सतीश भिसे, भास्कर काटरे व शेखर बर्गे यांचा सत्कार करण्यात आला. लोकशाही आघाडीच्या सभागृहात विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक हणमंत पवार, शिवाजी पवार, जयंत बेडेकर उपस्थित होते.


विरोधी पक्षनेते सौरभ पाटील म्हणाले, कोरोनासारख्या लढ्यात नगरपालिकेतील संबंधित कर्मचाऱ्यांनी सैनिकांप्रमाणे काम केले आहे. चोवीस तास शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच कोरोनाबाधीत रूग्णांवर अत्यंसंस्काराचे सोपस्कर पूर्ण करताना त्यांनी अत्यंत धाडसी काम केले आहे. यावेळी रूग्णवाहीका उपलब्ध करून देणेही शेखर बर्गे यांचे काम अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे श्री. बर्गे यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धाडस स्फूर्तीदायी आहे. त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकशाही आघाडीतर्फे त्यांचा सत्कार करत आहोत. पालिका कर्मचाऱ्यांचे धाडस, त्यांची काम करण्याची चिकाटी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठीची धडपड यावर पालिकेचा लौकीक टिकून आहे. 


नियोजन सभापती वाटेगावकर म्हणाले, शहरातील स्वच्छता होतच असते. मात्र त्यात नियोजन व सातत्य कायम ठेवणारे पालिका कर्मचारी म्हणजे सैनिकच आहेत. कोरोनाच्या भितीने जगाला ग्रासले आहे. मात्र त्याच आजाराने मृत झालेल्या व्यक्तीवर येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्यावर अत्यंसंस्कार करणाऱ्या पालिकेच्या कर्माचऱ्यांनी केलेले काम हीच खरी देशसेवा आहे. रूग्णवाहिका उपलब्ध करून देवून शेखर बर्गे यांनीही एकप्रकारे देशसेवाच केली आहे. यावेळी हणमंत पवार, जंयत बेडेकर यांचेही मनोगत झाले.