बातमीसह विश्लेषण.....
कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 2 अनुमातांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह...1 अनुमानितचा रिपोर्ट निगेटिव्ह.. 68 जण विलगीकरण कक्षात दाखल
कराड तालुका हा सुजलाम-सुफलाम व विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण असणारा तालुका म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा कराड तालुका हा आकाराने मोठा आहे.दरम्यान सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असणाऱ्या कराड तालुक्यांमध्ये कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंता करणारी बाब असून आता तरी नागरीकांनी शासन करीत असलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता कोरोना बाधित रुग्णांची संख्या कराड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 8 झाली आहे.रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कराड तालुका रेडझोनमध्ये जाणार की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोना संसर्ग हा जगभराची डोकेदुखी असला तरी, तो आपल्या गावात येऊ नये. आपल्या शहरात येऊ नये. यासाठी राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक प्रशासनाने अनेक वेळेला वेळोवेळी परिपत्रके, आदेश काढून लोकांना सावधगिरी बाळगण्याचे इशारे दिले आहेत. काय करावे, काय करू नये याच्या सूचनाही केल्या आहेत. बहुतांश करून नागरिक सूचनांचे पालन करीत आहेत. तरी देखील "कोरोना" आपले हातपाय पसरतोय, ही मात्र गंभीर बाब आहे.कोरोना आपल्या गावाच्या वेशीपर्यंत थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लॉकडाऊन कडकडीतपणे पाळणे, घराबाहेर न येणे, इतरांच्या संपर्कात न येणे, हा एकमेव सध्यातरी जालीम उपाय आहे.
कराड शहराला लागून असणाऱ्या गावांमध्ये कोरोना आला आहे. बाबरमाची परिसरातील रूग्णांच्या संपर्कात आल्याने वनवासमाची (खोडशी) आणि आगाशिवनगर (मलकापूर) येथील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता काय करायचे ? असा सर्वांसमोर प्रश्न पडला आहे. अनावश्यक, किरकोळ कारणासाठी घराच्या बाहेर पडल्याकारणामुळे कोरोना बाधित कोण आहे ? कोण नाही, हे न समजल्यामुळे इतरांच्या संपर्कात येणे म्हणजे कोरोनाला आपणहून आमंत्रण देण्यासारखे आहे. कराड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ८ झाली असून सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या १६ इतकी झाली आहे. यामुळे आता सातारा जिल्हा रेड झोनमध्ये जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
टाळ्यांच्या गजरात 3 कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होऊन घरी गेले. याशिवाय 2 कोरोनाग्रस्त रूग्णांचा उपचारावेळी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मागील सहा दिवसांत कराड तालुक्यात ६ नवे कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत.
बातमी.......
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 2 अनुमानितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह..... 1 अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 68 जणं विलगीकरण कक्षात दाखल
कराड : 38 पुरुष व 25 वर्षीय युवकाला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे कोरोना बाधिताच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून हे दोघेही कोरोना बाधित (कोविड-19) असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या दोन कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत.
तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 1 अनुमानित निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 19, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 13, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 13, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 9 असे एकूण 68 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.