मलकापूर नगरपरिषदेचा निर्णय- कोरोना लढ्यात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना रक्कम रुपये 25 लक्ष विमा संरक्षण 


मलकापूर नगरपरिषदेचा निर्णय- कोरोना लढ्यात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना रक्कम रुपये 25 लक्ष विमा संरक्षण 


कराड - जागतिक स्तरावर तसेच भारतामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी मा. प्रधानमंत्री व मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशान्वये शासनाने उपाययोजना म्हणून दि. 24/03/2020 पासून दि. 14/04/2020 पर्यंत लॉकडॉऊन केले होते. तथापि, विषाणुचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता लॉकडाऊनची मुदत दि.03/05/2020 पर्यंत वाढविणेत आलेली आहे. यादरम्यान महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागु केलेली असून, लॉकडाऊन कालावधीमध्ये सार्वजनिक अत्यावश्यक सेवा यामध्ये किराणा, भाजी पाला, दुध व औषध दुकाने सुरु ठेवणेत आलेली असून, इतर कोणत्याही आस्थापना, उद्योग धंदे, व्यापार, सार्वजनिक कामे, छोटे-मोठे कारखाने लॉकडाऊनमुळे बंद असलेने रोजंदारी करणाऱ्या मजुरांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा व धान्याचा तुटवडा पडून त्यांच्या जीवनमानावर याचा परिणाम होत आहे. याबाबीचा विचार करुन मलकापूर नगरपरिषदेने गरजु व रोजंदार करणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे तसेच शहरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य, कोरोना विषाणु प्रादुर्भाव रोखणेसाठी आवश्यकत्या सर्व उपाययोजनांची माहिती घेऊन चर्चा करणेसाठी बैठकीचे आयोजन लक्ष्मीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगण, मलकापूर या ठिकाण सोशल डिस्टन्सींग ठेऊन करणेत आले होते.या दरम्यान कोरोना संदर्भाव विविध विषयांवर चर्चा करुन मान्यता देणेत आली. मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता नगरपरिषदेकडील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. यामध्ये आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग व प्रशासन विभागातील सर्व विभाग कार्यरत आहेत. सदरचे काम हे जबाबदारीचे व धोकादायक आहे. दि. 15/04/2020 रोजी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकाच्या धरतीवर मलकापूर नगरपरिषदेकडून रक्कम रुपये 25 लक्ष विमा संरक्षण देणेबाबत श्रीमती संजीवनी दळवी, मुख्याधिकारी यांनी सुचना केली होती त्यास सौ. निलम येडगे, नगराध्यक्षा सह पदाधिकारी व उपस्थित सर्व नगरसेवक यांनी मान्यता दिली. तसेच या कालावधीमध्ये काम करणाऱ्या वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांना रक्कम रुपये 5000 व वर्ग 3 मधील कर्मचा-यांना रक्कम रुपये 2500 प्रोत्साहन अनुदान देणेचे मान्य केले आहे. 


मलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषद कर्मचारी यांच्यामार्फत शहरातील गरजु व रोजंदार करणाऱ्या यामध्ये घरगुती धुणे भांडी करणाऱ्या महिला, शेत मजुर, गवंड्‌यांच्या हाताखाली काम करणारे मजुर, गवंडी व सेंट्रींग काम करणारे मजुर ज्यांच्याकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही अशा लोकांचे सर्व्हेक्षण केले असून, यामध्ये 2300 कुटुंबांचा समावेश आहे. संबंधित कुटूंबांना जीवनावश्यक वस्तु पुरवठा करणेचा निर्णय घेतलेला आहे. यापैकी मलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषदेचे सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पोंसीलिटी) फंडातून 7,72,101/- रुपये खर्च करुन 1000 गरजु व रोजंदार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप करणेत आलेले आहे. उर्वरित 1300 लोकांना शहरातील सामाजिक सेवासंस्था, उद्योगपती, कारखानदार, बांधकाम व्यवसायिक व सेवाभावी व्यक्ती यांचेकडून वस्तु स्वरुपात मदत घेऊन जीवनावश्यक वस्तु वाटप केलेली आहे. याकरिता मलकापूर नगरपरिषदेने सुरु केलेल्या आपत्ती व्यवस्थापन फंडास मान्यता देऊन त्यातून खर्च करणेस मान्यता दिली. 


मलकापूर नगरपरिषदेने शहरातील रेशनकार्ड धारकांना धान्य पुरवठा सुरळीत व्हावा व प्रत्येक रेशनकार्ड धारकाला धान्य उपलब्ध व्हावे याकरिता धान्य वाटप नियंत्रण समिती गठीत करणेत आलेली असून त्याचे अध्यक्ष श्री. राजेंद्र प्रल्हाद यादव, सभापती, बांधकाम समिती हे असून यामध्ये नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. दिनेश रैनाक, श्री. आनंदराव सुतार, श्री. प्रशांत चांदे, सौ. स्वाती तुपे, सौ. अलका जगदाळे, गावकामगार तलाठी व पोलिस पाटील, मलकापूर यांचा समावेश आहे. तसेच शहरामधील स्वच्छता राखणे व परप्रांतीय लोकांना धान्य वितरण करणेकरीता मा. उपनगराध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या पाणीपुरवठा, स्वच्छता व जलनिस्सारण समितीद्वारे शहरातील परप्रांतीय लोकांचे सर्व्हेक्षण करुन मा. जिल्हाधिकारी, सातारा यांचे सुचनेनुसार सेवाभावी व्यक्तींकडून धान्य उपलब्ध करुन वाटप करणेत येणार आहे. 
मलकापूर शहरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार उपाययोजना म्हणून जे नागरिक मास्क लावणार नाहीत सदर नागरिकांच्याकडून पहिला दंड रक्कम रुपये 50/- व नंतर 100/- रुपये दंड घेणेत येणार आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने गरीब व गरजु नागरिकांना मास्कचे वितरण करणेत येणार आहे. तसेच रस्त्यावर थंुकणारास रक्कम रुपये 100/- चा दंड घेणेबाबत मान्यता दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या वेळेत अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा.


सध्या मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रात परदेशातून 11 नागरिक, परराज्यातून 51 नागरिक आले असून, त्यांना कोरनटाईन शिक्के मारुन त्यांच्या घरी कॉरनटाईन करणेत आलेले आहे. तसेच मुंबई, पुणे व इतर शहरातून 708 नागरिक आले असून, या सर्व नागरिकांना घरी राहणेबाबत सक्त सुचना देणेत आलेल्या आहेत. 
सदर बैठकीस नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष श्री. मनोहर शिंदे, नगरसेवक श्री. राजेंद्र यादव, श्री. प्रशांत चांदे, श्री. दिनेश रैनाक, श्री. आबा सोळवंडे, श्री. किशोर येडगे, श्री. अजित थोरात, सौ. गितांजली पाटील, सौ. नुरजहान मुल्ला, सौ. आनंदी शिंदे, सौ. भारती पाटील, सौ. कमल कुराडे, सौ. शकुंतला शिंगण, सौ. पुजा चव्हाण, सौ. स्वाती तुपे, श्रीमती माधुरी पवार, सौ. निर्मला काशिद, सौ. अलका जगदाळे व सौ.नंदा भोसले, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी, सर्व विभाग प्रमुख, सर्व्हेक्षण करणारे सर्व प्रभाग प्रमुख, अंगणवाडी सेविका प्रतिनिधी, आरोग्य सेविका अधिकारी उपस्थित होते.