सामाजिक जाणीवेचे "गोड जेवण"....जोशी कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले 25 हजार रुपये

 


सामाजिक जाणीवेचे "गोड जेवण"....जोशी कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले 25 हजार रुपये


मुंबई : आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही... कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या या कवितेतील भावना प्रशांत भास्कर जोशी आणि त्यांचे कुटुंबिय प्रत्यक्ष अनुभवत आहेत. नुकतेच  सामाजिक न्याय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या प्रशांत जोशी यांच्या आईचे म्हणजे सौ. इंदुबाई भास्करराव जोशी यांचे  निधन झाले. आज त्यांच्या मातोश्रीच्या चौदाव्या दिवसाचा गंगापुजनाचा (गोडजेवण) कार्यक्रम.


            आईची आठवण आणि मनात दाटून आलेली  दु:खाची कड बाजूला ठेऊन त्यांनी सामाजिक जाणीवेतून  परंपरेला फाटा दिला. आईच्या चौदाव्याचा गोडजेवणाचा कार्यक्रम टाळून त्याचा 25 हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला.


            आज संपूर्ण जग कोरोना विषाणुशी लढत आहे. आपला देश आणि आपले राज्य ही पुर्ण क्षमतेने या युद्धात उतरलं आहे. आपल्या सगळ्यांना मिळून कोरोनाला हरवायचचं आहे. गर्दी टाळून- शिस्त पाळून. मग आईचा चौदाव्याचा कार्यक्रम कसा करणार? त्यापेक्षा तिच्या नावे फुल  ना फुलाची पाकळी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचा निर्णय जोशी कुटुंबियांनी घेतला आणि तो अंमलात देखील आणला.


            या "गोड जेवणाला" आई जाण्याच्या दु:खाची किनार असली तरी सामाजिक जाणीवेचे कोंदण आहे. असे अनेक मदतीचे हात या दानशूर महाराष्ट्रातून पुढे येत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करून मदत करत आहेत.  


            राज्यातली लहानगी चिमुरडी मंडळी वाढदिवसाचा खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहेत तर कुणी वस्तु स्वरुपात मदत करत आहे. याच दातृत्व भावाने केलेल्या मदतीमुळे आणि सहकार्यांच्या हातांमुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला आत्मबळ लाभत आहे.  या सर्वांच्या दातृत्वभावाला खरच मनापासून सलाम करावासा वाटतो.


            कोविड 19 या विषाणुशी लढतांना ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपली मदत देऊन या युद्धात सहभागी व्हायचे आहे अशांसाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 हे स्वतंत्र खाते उघडण्यात आले आहे. या खात्याचा तपशील असा आहे-


मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19


बचतखाते क्रमांक ३९२३९५९१७२०


स्टेट बँक ऑफ इंडिया़, मेन ब्रॅण्च


फोर्ट, मुंबई ४०००२३


ब्रॅण्च कोड ००३००


आयएफएससी कोड SBIN0000300


या देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80(जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सुट आहे.