325 लोकांना कराडमध्ये ५ रुपयेमध्ये शिवभोजन थाळी


325 लोकांना कराडमध्ये ५ रुपयेमध्ये शिवभोजन थाळी


कराड - महाविकास आघाडी सरकारच्यावतीने यापूर्वीच "शिवभोजन थाळी" ची योजना जाहीर केली. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावाचे संकट निर्माण झाल्यानंतर कराड शहरात पाच आणि मलकापूर येथे एका ठिकाणी शिवभोजन थाळीची सुरुवात करण्यात आली असून गरीब, गरजूनां पाच रुपयेमध्ये हिशोब भोजन थाळी उपलब्ध करण्यात आले आहे. तालुकास्तरीय समितीने पात्र असणाऱ्या केंद्रांची निवड करून शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यास परवानगी दिलेली आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. यामुळे समाजातील गरीब, गरजू, निराधार लोकांना दोन वेळचे अन्न मिळणे दुरापास्त झाले आहे. सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनळ पोलीस यांच्यावतीने जास्तीत जास्त निराधारांना अन्न देण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान कोरोनाच्या कालावधीमध्ये कराड व मलकापूर शहरांमध्ये गरीब,गरजू, निराधारांना अन्न मिळावे, यासाठी शिवभोजन थाळी असणारे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सदर शिवभोजन केंद्रांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे.


हरिप्रसाद हॉटेल, दौलत भोजनालय, समता जनाधार भोजनालय, मिसळ हाऊस, स्पॉस्ट स्नॅक स्पॉस्ट या पाच ठिकाणी शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली असून मलकापूर येथील परिवर्तन भोजनालय याठिकाणी गरजूंना शिवभोजन थाळी मिळू शकते. प्रत्येक केंद्रावर एकूण पन्नास लोकांना शिवभोजन थाळी उपलब्ध आहे. दरम्यान शाहू चौक येथील हरिप्रसाद हॉटेल येथे 75 लोकांना शिवभोजन थाळी मिळू शकते.


गरजू आणि भुकेले लोकांना शिवभोजन थाळी केंद्रांमध्ये पाठवण्यात यावे. यासाठी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, कर्मचारी यांनी गरजूंना याची माहिती द्यावी आणि शिवभोजन केंद्रांमधील अन्न खावे. कोणीही उपाशी राहू नये, यासाठी या केंद्रांमधून शिवभोजन थाळी घ्यावी अशी विनंती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे.