"तो " बाहेर आला... अनेकांचा विश्वास दुणावला ... !!


"तो " बाहेर आला... अनेकांचा विश्वास दुणावला ... !!


युद्धाच्या समरांगणात लढणाऱ्या योद्धयाला काळाचं भान राहत नाही...  त्याचं अंतिम ध्येय असतं...  हे रणांगण मारणं असतं. तसे अनेक योध्ये कोरोनाला ( कोविड -19 ) हरविण्यासाठी जीवाचं रान करत आहेत...  दुर्देवानी ज्यांना ह्या कोरोनाचा संसर्ग झाला आहे...  तेही आत त्याचं धैर्याने तोंड देत आहेत. सातारा जिल्ह्यात एक रुग्ण आतापर्यंत कोरोना मुक्त होऊन बाहेर आले आहेत. आजही एक 35 वर्षीय युवक मोठ्या धैर्यानी कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मधून बाहेर पडला त्या संदर्भातील हा रिपोर्ताज...  !!


 तो मुंबई वरून आला...  सगळं रुटीन सुरु होतं. एकदिवस त्याला नॉर्मल संडास लागली, डोकं दुखायला लागलं...  स्थानिक  डॉक्टरला दाखविले...  पण कमी होतं नाही म्हटल्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये आला...  भरती झाला. घशाचे स्त्राव घेतले...  दुसरा दिवस उजाडला तो कोरोना घेऊनच... प्रशासन सर्वाना धीर देत होते...  गावाला विश्वासात घेऊन प्रत्येक व्यक्ती आणि घर आरोग्य प्रशासनानी चेक केलं...  गावाला धडकी भरली होती. प्रत्येक जण एकमेकांना धीर देत होते अजूनही तें आत्मबळ मोठं आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये...  या युवकांनी तर किती मोठा धीर आणि आत्मबळ तयार केलं असेल. पंधरा दिवस लिहायला आणि बोलायला सोपे आहेत..  पण अशा अवस्थेत रोजचा दिवस काढायला मोठं स्पिरिट लागतं आणि मनात उद्याचा दिवस उत्तम काही तरी घेऊन येईल हा आत्मविश्वास हवा, तोच आत्मविश्वास या युवकामध्ये दिसला...


स्वप्नाप्रमाणे भासेल सारे


जातील साऱ्या लयाला व्यथा


भवतीं सुखाचे स्वर्गीय वारे


नाही उदासी ना आर्तता


या गीताच्या काव्यपंक्ती जणू आज त्याच्या बाहेर पडतानाच्या ध्येय बोलीतून दिसत होत्या. कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. हा युवक कक्षातून निघाला तिथून ते गाडीत बसेपर्यंत टाळ्यांचा कडकडाट होत होता. या कडकडातच त्यांनी हॉस्पिटल, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे ऋणनिर्देश केले आणि शेवटी युद्ध भूमीतल्या सैनिकाप्रमाणे त्यांनी मला कोरोनाला हरविण्याच्या युद्धात कुठेही माझी गरज पडली तर बोलवा मी तयार आहे. या आश्वासक बोलण्याने आरोग्य सेवेत काम करणाऱ्यात मोठे बळ आले. या अनमोल क्षणाचे साक्षीदार होते तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्यासह डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.


               या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि यांची टीम.. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आरोग्य टीम,  कृष्णा  हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स यांच्या अथक प्रयत्नातून मोठा धैर्य देणारा टप्पा दिसला आहे. लोकांनाही कोरोना हरतो आहे,  त्यामुळे प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आता आपण होऊन पाळल्या पाहिजेत ही भावना जनतेमध्ये प्रबळ झाली आहे...  असे वाटण्यासारखे चित्र निर्माण झाले आहे...  चला उर्वरित लढाई जिंकू या...  घरातच बसून थोडा त्रास होत असेल तरीही कोरोनाला हरविण्याच्या युद्धातले तुम्ही सैनिक आहात हे मनोमन पक्क करून...  आत्मबळ वृध्दिंगत करू या...  !!


@ युवराज पाटील                                           


 जिल्हा माहिती अधिकारी, सातारा