काळ माफ करणार नाही..... कोण खरे, कोण खोटे, यापेक्षा कराडकरांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे...


काळ माफ करणार नाही..... कोण खरे, कोण खोटे, यापेक्षा कराडकरांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे..."कोरोना"च्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये औषध फवारणी करण्याच्या मुद्द्यावरून ज्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. ते याठिकाणी सविस्तरपणे "जसे आहे तसे" मांडले असून नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना जर कोणी राजकारण करत असेल तर, काळ माफ करणार नाही..! हे मुद्दामून याठिकाणी ठणकावून सांगावे लागत आहे. कारण महामारीचे संकट समोर असताना महामारीवर उपाय योजना करताना शुल्लक कारणासाठी जर कोण अडेलतट्टूपणा करत असेल अथवा राजकारण करत असेल तर महामारीचे संकट संपल्यानंतर कराडचे नागरिक चावडी चौकात सर्वांची एकदा झाडाझडती घेतील. कराडकर नागरिक शांत, संयमी आहेत. संकट समयी ते आपली संवेदनशीलता टिवकून आहेत. कराडकर नागरिकांची काळजी घेणे, हे मातृसंस्था म्हणून कराड नगरपालिकेचे प्रशासन व लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य आहे. यासाठी राजकारण करण्याची गरज नाही. उणीधुणी अथवा माझा का तुझा अधिकार ? अशा कायद्याच्या चौकटीचा बागुलबुवा करणे हे योग्य नाही.जे जे आपणासी करावेसे वाटेल...ते ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावे... आणि लोकप्रतिनिधींनीही करावे.. कारण महामारीचे संकट आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना "उगाच नको ती उचापत" करण्यात काहीच अर्थ नाही.


हिथे हेतूपुरस्सर कुणालाही दुखावण्याचा अथवा कुणालाही शहाणपण शिकवण्याचा उद्देश नाही. मात्र प्रत्येक जण आपले प्रामाणिकपणे कर्तव्य करीत असताना, कोणी कोणाला आडकाठी आणू नये. कोणी कोणाच्या कामात आडकाठी आणतो म्हणून खापर फोडू नये. महामारीच्या संकटकाळात जर कोणी दुष्ट हेतूने अथवा हेतुपुरस्कर मनी किंतू - परंतु ठेवून काम करत असेल तर नक्कीच त्याला "काळ माफ करणार नाही."कराडच्या नगराध्यक्षांची बेजबाबदार वर्तणूक - लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांची पोस्ट....


आज संपूर्ण विश्व कोरोना या जीवघेण्या साथीच्या रोगाविरुद्ध लढा देत आहे. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे जी, पालकमंत्री श्री. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सर्वच शासकीय प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र राबत आहेत. 


लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील हे नगराध्यक्ष यांचा कामकाज पद्धतीबाबत लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काम करीत आहेत. या विरोधात नगराध्यक्षा भूमिका घेत आहेत. कराड नगरपालिकेमार्फत जंतूनाशक फवारणी केली जात होती. वाघेरी रोडला एक हॉस्पिटल ताब्यात घेऊन तिथे वेळ आलीच तर शहरातील नागरिकांना कोरंटाईन करण्यासाठी कॉट्स, गाद्या, पाणी आदी सर्व यंत्रणा तयार ठेवली आहे. परंतु आमच्या नगराध्यक्षांनी यात मान सन्मानांची भूमिका घेतली. संबंधित कागदपत्रांवरती तीन तारखेपासून सहीच केली नाही. परिणामी पालिका प्रशासनाला जंतूनाशक फवारणी बंद ठेवावी लागली. यावरून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 


आत्ताची वेळ काय आहे ? यांचे चाललेय काय ? तर मला विचारलेच नाही. हे आत्ताचेच नाही तर गेले तीन वर्ष हेच पाहतो आहोत आम्ही. दरवेळी यांचे हे मानापमान नाट्य सुरूच असते. आज इतक्या गंभीर परिस्थितीशी लढताना केवळ फोटो सेशन उपयोगाचे नाही. तर जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे.अशा बेजाबादार नगराध्यक्षांना पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी आम्ही करतो आहे. तशी तक्रार मा. जिल्हाधिकारी यांचेकडे करणार आहोत.


इथे एक विरोधाभास बघा. अनेक सामाजिक संस्था, दानशूर मंडळी या परीस्थितीमध्ये पदरमोड करून गोरगरीब जनतेसाठी वाटा ऊचलत आहेत आणी या नगराध्यक्षांचेच एक सहकारी नगरपालिकेचे एक ऊमदेवार अवैध गूटखा विकताना सापडले आहेत. या कठिण प्रसंगातपण यांना स्वतःचे खिसे भरायचा स्वार्थ दिसतो. काय म्हणावे या प्रवृत्तीला. आता या लोकनियूक्त नगराध्यक्षांना जनतेनेच जाब विचारला पाहिजे.विजय वाटेगावकर यांनी यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव करीत असलेल्या कामांबाबत केलेली पोस्ट.....


कोरोना या महामारीने सगळे जग व्यापले आहे आपल्या देशात व राज्यातही गतीने ही महामारी हातपाय पसरायला लागली आहे याची झळ कराडकरांना लागु नये यासाठी सत्तारुढ आघाडीचे नेते मा.राजेंद्रसिह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक गेला महीनाभर जीवाचे रान करत आहोत यामधे प्रामुख्याने नागरीकांची सुरक्षा व त्यांच्या दैनंदिन गरजा याला प्राधान्य देत आम्ही विविध स्तरावर काम करीत आहोत यामधे प्रामुख्याने ज्यांचे हातावर पोट आहे अशा नागरीकांसाठी महिनाभर पुरेल इतक्या दैनंदिन गरजेच्या वस्तुंचा पुरवठा केला. शहरातील गल्ली मोहल्ल्यात स्वखर्चाने औषध फवारणी सुरु केली त्यासाठी दोन फवारणी मशिन मागवल्या.पोलीसांच्या मदतीने गावाची नाकाबंदी,नागरीकांना दररोज भाजीपाला, फळे व जीवनावश्यक वस्तु त्यांच्या दारात मिळाव्यात म्हणुन पेठेप्रमाणे नियोजन केले.साफसफाई कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली.कोरोनाची लागण झाली तर त्यांना काॅरंटाईन करण्यासाठी शहराबाहेर चाळीस बेडची व्यवस्था केली.


कराडशहर ही आपली कर्मभुमी असुन या शहरावर कोणतीही आपत्ती आली तरी आपली नैतिक जबाबदारी म्हणुन काम करत असलेले राजेंद्रसिह यादव यांच्या पाठीशी आघाडीचे सर्व नगरसेवक तन मन धन अर्पुन काम करत आहेत मात्र गेल्या काही दिवसात नगराध्यक्षांच्या अडमुठे धोरणामुळे प्रशासनाला काम करणे अडचणीचे ठरायला लागले आहे खरे तर अशावेळी वैयक्तिक स्वार्थ बाजुला ठेवुन जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांनी वावरणे आवश्यक आहे.या विषयावर आमचे नेते राजेंद्रसिह यादव यांचे स्पष्ट म्हणणे आहे की गावावर आलेल्या संकटावेळी प्रत्येकाने राजकारणाचे जोडे बाहेर ठेवुन गावाच्या भल्यासाठी हातात हात घालुन संघटीतपणे काम करणे आवश्यक आहे.


आम्ही सर्व नगरसेवक कोरोनाची झळ गावाला बसु नये यासाठी युध्द पातळीवर काम करीत मात्र नगर पालिकेत चाललेल्या भोंगळ व स्वार्थी कारभाराबद्दल आम्ही मा.जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्री व मा.मुख्यमंत्री यांच्याकडे योग्य पध्दतीने तक्रार करणार आहोत.मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचे म्हणणे....


यात मूळ मुद्द्याला बगल दिली जात आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत, त्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहेत, म्हणून प्रशासनाने निविदा काढण्यासाठी मा अध्यक्ष यांच्याकडे मान्यता मागितली होती.त्यावेळी 3 एप्रिल रोजी भालदार समक्ष चर्चा करावी असे सही करून लिहिले,4 एप्रिल रोजी भालदार अभियंते यांनी मा अध्यक्ष यांच्या समवेत समक्ष चर्चा केली परंतुआज 11 एप्रिल झाले तरीदेखील मा अध्यक्ष यांची सही न झाल्याने निविदा काढता आली नाही.अरुंद गल्ली बोळात अग्निशमन गाडी द्वारे फवारणी करणे शक्य नसल्याने लहान ट्रॅक्टर द्वारे फवारणी ची गरज आहे व होती.


मा अध्यक्ष यांना याबाबत भालदार यांनी कल्पना देऊन छोटे ट्रॅक्टर फवारणी साठी लावले ले होते. एक बाजूला विश्वासात घेत नाहीत म्हणून तक्रार करायची आणि विश्वासात घेतले तर असहकार्य भूमिका घ्यायची हे दुटप्पी धोरण आहे.


मुख्याधिकारी यांना 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून खर्च करण्याचा अधिकार जरी असला तरीदेखील त्यासाठी निविदा काढावी लागणार आहे व कारयोत्तर मंजुरी देणेचा अधिकार नगराध्यक्ष यांचा आहे त्यामुळे नगराध्यक्ष यांनी वेळेवर सही केली असती तर अल्प मुदतीची निविदा निघाली असती व छोटे ट्रॅक्टर बंद करण्याचा विषय आला नसता. ट्रॅक्टर या विषयासोबत इतरही कामे करावयाची आहेत .त्यामुळे मा अध्यक्ष यांनी सही करूनवेळेत निर्णय घ्यावा ही कराडकर यांच्या वतीने विंनती आणि अपेक्षा करतो.नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी प्रकट केलेले खुलासा....मनोगत.....


आज प्रसिद्ध झालेल्या काही दैनिकात कराड शहरातील औषध फवारणी बंद... याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रकारामध्ये माझ्या नावाची नाहक चर्चा होत असून कोणतीही माहिती माझेकडून न घेता याबाबतच्या बातम्या दिल्या असून या आधारावरच सोशल मीडियामध्ये सुद्धा उलट सुलट चर्चा सुरु आहेत. हे अतिशय उद्वेगजनक आहे.


- कोरोना व्हायरसची साथ सूरु झालेपासून मी स्वतः संपूर्ण शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहे. पालिकेच्या सर्व अधिका-यांशी मी वेळोवेळी संपर्कात असून त्यांना योग्य ते आदेश देत आहे. पहिले काही दिवस फायर फायटरने शहरात औषध फवारणी सुरु होती त्यावेळी मी स्वतः त्या गाडीबरोवर शहराच्या विविध भागामध्ये फिरले आहे. यानंतर प्रशासनाने फायर फायटर बंद करून 2 ट्रकटरच्या सहायाने शहरात औषध फवारणी सूरु केली. पण फायर फायटर च्या मोठ्या गाडीने
जास्त फवारणी होत असल्याने यासाठी आवश्यक असणारे हॅडपंप,पाईप नादुरुस्त होत्या मी स्वतः फायर स्टेशन येथे जाऊन संबधित ठेकेदार यांना बोलावून हे सर्व लगेच दुरुस्त करून घेतले. तसेच औषध फवारणी हि कोणत्याही परिस्थितीत थांबली नाही पाहिजे याचे स्पष्ट निर्देश मी अधिका-यांना दिलेले आहेत. हे सर्व करत असताना मी फक्त माझ्या शहराच्या आरोग्याचाच विचार करत आहे. याच्या बातम्या करणे, प्रसिद्धी मिळवणे या सर्व गोष्टींपासून लांब राहून मी माझे काम करत आहे.


राहिला प्रश्न माझ्या मनापमानाचा तर गेली तीन, साडेतीन वर्ष मी नगरपरिषदेमध्ये प्रथम नागरिक म्हणून काम करत असताना कधीही या गोष्टींचा विचारही केला नाही माझे काम प्रामाणिकपणे करत आहे. हे काम करताना मी गट.तट पक्ष असा कधीही भेदभाव केलेला नाही. व करणारही नाही. औषध फवारणी बाबत मी आरोग्याच्या सर्व अधिका-यांना स्पष्ट निर्देश देवून औषध फवारणी, साफसफाई हि कामे अजिबात थांबता कामा नयेत याच्या स्पष्ट व सक्त सूचना दिल्या आहेत, अधिका-यांच्या म्हणण्यानुसार शहरात सर्वत्र नगर परिषदेच्या वतीने औषध फवारणीचा एक टप्पा पूर्ण झाला असून, विलागीकरण कक्ष तयार करणे, त्यातील सुविधा, गरजूंना अन्नपुरवठा, शहर वासियांना दुध,किराणा, औषधे याचा पुरवठा याबाबत सर्व नियोजन झालेले असून याचा संपूर्ण आढावा मी स्वतः घेतलेला आहे. यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते, मंडळे,दानशूर व्यक्ती यांना मी स्वतः वयाक्तिक फोन करून सामाजिक मदतीचे आवाहन केले.व यास सकारात्मक प्रतिसाद देवून त्यांचे मार्फत शहरात विविध भागात औषध फवारणी धान्य वाटप सूरु
आहे या लोकांनाही नगर परिषद हवे ते सहकार्य देत आहे. आत्ता शहरात जी औषध फवारणी सुरु आहे त्यासाठी लागणारे औषधे, पाणी याचे नियोजन सुद्धा नगरपालिकाच करत आहे. हि वस्तुस्थिती आहे. आणि तसेच शासनाचे दि.27 मार्चच्या परिपत्रकानुसार स्पष्ट आदेश दिले आहेत कि, नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची वाहनेच शहरामध्ये औषध फवारणी प्रथम प्राधान्याने करतील. असे असताना‌ अग्निशमन दलाची गाडी ( मर्यादा 5000 लिटर) बंद करून खासगी वाहन ( मर्यादा 200 ते 250 लिटर) कोणाच्या तरी फायद्यासाठी वापरून शहरात औषध फवारणी सुरु केली आहे. ती का व कश्यासाठी ? आता या सर्व बाबी लक्ष्यात घेतल्यानंतर कराडचे अतीकर्तव्यदक्ष मुख्याधिकारी‌ श्री यशवंत डांगे यांनी नगराध्यक्षा यांनी अद्याप या सर्व बाबतीत निर्णय घेतलेला नाही. अशी प्रतिक्रिया देणे हे अतिशय बालिशपणाचे आहे. 


महाराष्ट्र शासनाने दि.२८ मार्च 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार ब वर्ग मुख्याधिकारी यांना 14 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून कोरोना आजाराशी संबधित कामे करण्यासाठी रक्कम रु. 10 लाख इतकी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार दिलेले असल्याचे स्पष्ट निर्देश‌ दिलेले आहेत. मग त्यांना शासनाने एवढे स्पष्ट अधिकार दिले असताना त्यांनी एक कागद माझ्याकडे सहिला पाठवला. त्यातील सर्व कामे अगोदरच पूर्ण करून घेतली आहेत आणि फक्त या कागदावर मी सही केली नाही म्हणून औषध फवारणी थांबली‌ आहे. अशी खोटी अवई उठवून जे घाणेरडे राजकारण खेळण्याचा प्रकार केला आहे. यातून यांना काय सिद्ध करायचे आहे, या सर्व हीन प्रकारचा मी त्रीव्र शब्दात निषेध करते. व जनतेलाही आवाहन करते कि या बिकट प्रसंगात सर्व जग अडचणीत‌ असताना मी आज पर्यंत कधीच खालच्या पातळीवर येवून वागलेली नाही व येथून पुढेहि वागणार नाही. माझे शहर हेच माझ्यासाठी सर्वस्व असून अधिकारी येतील जातील पण शहर माझे कुटुंबीय आहे त्याची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे.


आपली विश्वासू,
सौ.रोहिणी उमेश शिंदे