कराडच्या दोन नागरिकांनी पहिल्याच दिवशी भरला वार्षिक संकलित कर
कराड - 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर नगरपालिकेच्या 1 एप्रिल पासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षामध्ये प्रथम दोन मिळकत धारांनी वार्षिक कर भरून नागरिकांचे कर्तव्याचा सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. अतुल शिंदे, देविदास शानबाग या सजग नागरिकांनी एकूण तीन मिळकतींची संपूर्ण संकलित कराची रक्कम भरली आहे. देविदास शानभाग यांचेकडून कराची रक्कम स्वीकारताना कर निरीक्षक उमेश महादर, कर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या तीन महिन्यापासून कराड नगरपालिकेच्या कर विभागाने कराडमधील मोठ्या प्रमाणात कर वसुली करण्यावर भर दिला होता.कराड मधील प्रत्येक मिळकतधारकांनी आपली मागील येणे बाकी व चालू वर्षाचे कर-आकारणी रक्कम भरावी यासाठी आग्रह केला जात होता. दरम्यान थकबाकीदारांच्या व्यवसायिक गावांना सील करण्यात आले होते. तर अनेकांचे पाणी कनेक्शन बंद करण्यात आले होते. दरम्यान कोरोना वायरस या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर झाल्यानंतर कर वसुली बंद झाली होती. दरम्यान या परिस्थितीत ही नगरपालिकेत प्रत्यक्ष येऊन मिळकतधारकांनी आपल्या घराची घरपट्टी व पाणीपट्टी भरली आहे.
दरम्यान सन 2020-21 या नवीन आर्थिक वर्षाचा संकलित कराची रक्कम सालाबादप्रमाणे 2 मिळकत धारकांनी नगरपरिषदेकडे जमा केलेली आहे. अतुल मोहन शिंदे रा. 671, शुक्रवार पेठ, कराड व 653, शुक्रवार पेठ, कराड या दोन मिळकतीचा एकूण कर रुपये 6033/- आणि देविदास मनोहर शानभाग, रा. 269, सोमवार पेठ कराड या मिळकतीचा एकूण कर रुपये 6951/- संकलित कर नगरपालिकेकडे जमा केला आहे. या तीन मिळकतीचा एकूण कर रुपये 12984/- चालू आर्थिक वर्षात नगरपालिकेकडे जमा झाला आहे.
अतुल शिंदे, देविदास शानबाग या कराडमधील नागरिकांनी नगरपालिकेचा वार्षिक संकलित कर पहिल्या दिवशी भरल्याबद्दल कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.