कार्यकर्त्यांसाठी सदेह व सदैव झटणारे उंडाळकर कुटुंबं


कार्यकर्त्यांसाठी सदेह व सदैव झटणारे उंडाळकर कुटुंबं


सत्ता आली की कार्यकर्त्यांना गंगाजळीत टाकून देणारे अनेक नेते आपण पाहतो किंवा निवडणूक झाली की कार्यकर्त्यांना अडगळीत फेकून खुशमस्कऱ्यांत मश्गुल होणारेही नेते आहेत मात्र सत्ता असो किंवा नसो पण कार्यकर्त्यांसाठी जिवानिशी व जातीनिशी सदैव उपलब्ध असणारे राजकीय घराणे म्हणून उंडाळकर कुटुंबाचा लौकिक खूप वेगळा आहे. आजवर अनेक कुटुंबांना , अनेक कार्यकर्त्यांना चित्रविचित्र प्रसंगात तत्काळ धावून त्यांनी सर्वतोपरी मदत केली आहे. म्हणूनच सत्ता नसली तरी उंडाळकरांचे कराडचे व सातारचे निवासस्थान आजही एखाद्या देवस्थानासारखे गजबजलेले असते.


सामाजिक संस्कार पिढीजात असतात. स्वा.सेनानी दादा उंडाळकर हे उंडाळे भागातील जणू एक न्यायपीठच होते. पोलीस आणि कायद्याला भिरकावून देणाऱ्या दंडेलबाज माणसांचीही दादांपुढे टाप चालत नसे एवढे ते करारी व आदरभारीत व्यक्तीमत्व होते. ते हयात असेपर्यंत त्या परिसरातील कसलेच प्रकरण पो.स्टेशन किंवा न्यायालयात सहसा जात नसे. संध्याकाळी घरी जाता जाता ते नित्यनियमाने गांवच्या धर्मशाळेत आवर्जुन जायचे व कोण पांथस्थ आला आहे का ते पहायचे? असेल तर मग घरी जावून त्याला जेवण व पांघरूण घेऊन यायचे असे अनेक प्रसंग/किस्से आदरणीय लोकनेते विलासकाका आम्हाला सांगतात. व ते संस्कार वेगळ्या पद्धतीने काका-काकी या उभयतांनीही पुढे अखंड जपले. ती वहिवाट युवानेते आज उदयसिंह दादाही कटाक्षाने जपताहेत.


परवाचा एक असाच प्रसंग. कराड पं.समितीचे उपसभापती व दादांचे निष्ठावंत सहकारी मा.रमेश देशमुख यांना शेतात काम करत असताना दि.१८ एप्रिल रोजी अचानक चक्कर येऊन मूर्च्छा आली. तो उष्माघात होता किंवा काय कोणासठावूक पण रक्तदाब वाढून ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने कराडला सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हाॕस्पिटलला आणण्यात आले. उपचार सुरू झाले. उदय दादांना ही बातमी कळताच , काही वेळातच ते तत्परतेने तेथे आले. काही महत्वाच्या चाचण्या होईपर्यंत अडीच तीन तास ते तेथे थांबले. मेंदूत रक्तस्त्राव झाला होता हे चाचणीत निष्पन्न झाले. त्यामुळे पुढील उपचार एखाद्या निष्णात न्युरोसर्जनकडे करणे गरजेचे बनले पण त्याअगोदर प्रकृतीचा धोका टाळणे गरजेचे होते. त्यादृष्टीने दोन दिवस तेथेच उपचार करून नंतर डाॕ.प्रभू यांचेकडे घेऊन जायचे असा कुटुंबिय व कार्यकर्त्यांचा विमर्श चालला होता, अगदी जवळजवळ तसे ठरल्यातच जमा होते पण काकांना ते पटले नाही. त्यांनी सातारच्या यशवंत हाॕस्पिटलच्या डाॕ.अनिल पाटील यांचेशी अगोदरच चर्चा केली होती त्यामुळे त्यांनी सातारला आणण्याच्या सूचना (जणू हुकूमच) दिला. मग सातारला नेऊन पुढील उपचार सुरू झाले. दरम्यान स्वतः आजारी असूनही या वयात देखील काका सतत डाॕक्टरांशी संपर्कात राहीले. उदयदादाही अधून मधून सतत तेथे जात होते. आज रमेश देशमुख सुखरूप आहेत. आॕपरेशन शिवाय त्यांची प्रकृती धोक्यातून बाहेर आलीय. हे जेवढे डाॕक्टरांचे यश आहे तेवढेच एक योग्य व तत्परतेचा निर्णय जो काकांनी घेतला तोही तेवढाच महत्वाचा आहे. 


याहून कितीतरी भयंकर प्रसंगात अनेक कार्यकर्त्यांसाठी या परिवाराने नेहमी बाजी लावलेली आहे. किंबहूना काका नेहमी सांगतात की कार्यकर्त्यांच्या वेदनेची कळ आम्हाला येते. आणि खरंच उंडाळकर घराणे कार्यकर्ता हा आपल्याच परिवाराचा घटक मानतात. कार्यकर्त्यांच्या जिवावर आलेल्या कसल्याही प्रसंगात ते छातीची ढाल पुढे करून येतात. 


काका नावाच्या नेत्याची मदत झाली नाही असा एखादाही कार्यकर्ता सापडणार नाही. उंडाळ्यापासून खंडाळ्यापर्यंत ही यादी मोजताही येणार नाही एवढी मोठी असेल. काही कार्यकर्त्यांवर तर कौटुंबिक अडचणींपासून ते निवडणूक काळात अपहरण होण्यापर्यंतचे नाना जीवघेणे प्रसंग येऊन गेलेले होते. अशा सर्व प्रसंगात अगदी मध्यरात्री उठून काका जातीनिशी हजर झालेले आहेत. सातारहून वेळ न दवडता भर मध्यरात्रीही येवून पोलीसांचा हागमूत एक केलेला आहे.अशा प्रकारे काही कार्यकर्त्यांची तर सगळीच बाळंतपणे काकांनी निस्तरली आहेत. आजही काकांच्या कार्यकर्त्यांचे काम कोण प्रशासक अडवत नाही. हे त्यांच्या नैतिक राजकारणाचे मूल्य आहे. 


काकांचे आता वय झालेय, त्यामुळे अधूनमधून त्यांना प्रकृती अस्वास्थ्याला सामोरे जावे लागतेय. मात्र तरीही ते त्यातूनही सर्व कार्यकर्त्यांची फोन करून विचारपूस करतात. काहींना तर रोजच न चुकता फोन करतात. कोरोनाचा कहर झाल्यापासून तर रोज शेकडो कार्यकर्त्यांना फोन करून माहीती घेतायत. सूचना करताहेत. काकांसारखे असे राजकीय व्यक्तिमत्व राज्याच्या राजकारणात सहसा दुसरे नाहीच. दोन वर्षापूर्वी त्यांच्या गौरव ग्रंथाचे काम करत असताना त्यानिमित्ताने मला खूप फिरणे झाले. त्याकामी दूर दूर जावून सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत अनेकांचे अभिप्राय पाहीले. काकांबाबतचे ते प्रसंग, अनुभव खूपच विलक्षण खूपच विस्मयचकीत करणारे आहेत.