कोरोनावर मात करण्यासाठी "बारामती पॅटर्न" मार्गदर्शक : जिल्हाधिकारी नवल किशोर राम


कोरोनावर मात करण्यासाठी "बारामती पॅटर्न" मार्गदर्शक : जिल्हाधिकारी नवल किशोर राम


 


बारामती - कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशामध्ये वेगवेगळया प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार बारामती येथील प्रशासनाकडून करण्यात येणा-या उपाययोजना या  इतर भागाकरीता अनुकरणीय असल्याने हा "बारामती  पॅटर्न" राज्यभर मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.


  कोरोना विषाणूमुळे बारामती येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे प्रशासनाला आवश्यक त्या   उपाययोजना  करण्याच्या सूचना केल्या. त्यानुषंगाने आज बारामती येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी योगेश कडूसकर, पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, सिल्व्हर ज्युबिली शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद काळे, रुई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल दराडे तसेच इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


              जिल्हाधिकारी राम यांनी बारामती येथे प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली. यावेळी बारामती शहरामध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यामुळे त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्या व्यक्तींना विलगीकरण करण्यात यावेत, त्यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, ज्या व्यक्ती होम  कोरंटाईन आहेत त्यांच्या हातावर शिक्के मारल्याची खात्री करावी.  तसेच वेळोवेळी त्यांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना  दिल्या. त्याबरोबरच  बारामतीमधील शासकीय रुग्णालये व खाजगी रुग्णालयांमध्ये  तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष व बेड तसेच व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक सामुग्रीच्या  उपलब्धतेचा आढावा घेतला.


 यावेळी  जिल्हाधिकारी राम यांनी स्थलांतरीत मजुरांच्या निवारा केंद्राबाबत माहिती घेतली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या मजुरांना भोजनाची कमतरता भासणार  नाही, याची काळजी घेण्याविषयी तसेच आवश्यकतेनुसार निवारा केंद्राची वाढ करण्यात यावी,  असे सांगितले.  शिवभोजन केंद्रामार्फत देण्यात येणा-या भोजनाचा आढावा घेतला. केंद्र व राज्य शासनाच्या अन्न व धान्य योजनांमधून पुरेसे धान्य त्या-त्या महिन्यात नागरिकांना वितरीत   करण्याच्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या  तसेच दूध, पाणीपुरवठयाबाबत वितरण व्यवस्थितपणे करण्यात यावे अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर प्रशासनाने आवश्यक ते निर्णय स्वत:च्या पातळीवर घेण्याचेही त्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तू जादा भावाने विकल्यास त्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.


 बारामतीमधील सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवावा, दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, आतापर्यंत सर्वच तयारीबाबत प्रशासनाने निश्चित चांगले काम केले आहे. या परिस्थिातीला आत्मविश्वासाने सामोरे जावे, याबाबतीत पूर्णपणे निष्कर्ष निघेपर्यंत  सतर्क रहावे, काही अडचण आल्यास तात्काळ कळविण्यात यावे, जेणेकरुन त्यावर उपाययोजना करता येणे शक्य होईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  बैठकीनंतर सिल्व्हर ज्युबिली शासकीय ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्ष तसेच बेड्सची व इतर आवश्यक साधनसामग्रीची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सदानंद काळे यांनी तयारीविषयी माहिती दिली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांशी जिल्हाधिकारी राम यांनी संवाद साधला व त्यांच्या अडचणींविषयी चर्चा केली.



असा आहे कोरोना प्रतिबंधाकरीता बारामती पॅटर्न


  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरामध्ये  प्रशासन आणि पोलीस यंत्रणेमार्फत एकूण 44 झोन केले असून त्यामध्ये प्रत्येक झोनसाठी मदत सहायता अधिकारी, त्यांना सहाय्य करण्यासाठी 10 स्वयंसेवक व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 वॉर्ड मार्शल नेमण्यात आला आहे. यांच्या मदतीने आरोग्य सेवा, रेशन, अन्नधान्य पुरवठा, दूध व भाजीपाला, फळे, गॅस सिलेंडर घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणार आहे. या टीममार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व त्याची साखळी तुटण्यासाठी ज्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यांचे हायरिस्क कॉन्टॅक्ट व लो रिस्क कॉन्टॅक्ट शोधून वेळीच त्यांना अलग करण्यात येईल व गरज भासल्यास त्यांची कोविड तपासणी करण्यात येईल.  आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांची तपासणी करुन ज्यांना रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) व इतर गंभीर आजार असल्यास शोधून त्यांची तपासणी करता येईल. तसेच या दरम्यान सोशल डिस्टंसींगची अंमलबजावणी होते की नाही यावर देखील नजर ठेवता येणे शक्य होईल.