पोषण आहार पुरवठा सुरळीत आठवड्याभरात वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : मंत्री यशोमती ठाकूर

 


घरपोच पोषण आहार पुरवठा सुरळीत आठवड्याभरात वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : मंत्री यशोमती ठाकूर


मुंबई : अंगणवाडी सेविकांच्यामार्फत वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (टीएचआर) येत्या आठवडा भरात सर्व बालकापर्यंत पोहोच केला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले. त्या अनुषंगाने ॲड. ठाकूर यांनी संबंधितांना निर्देश दिले.


            ॲड. ठाकूर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोषण आहार पुरवठा, अंगणवाडी सेविकांचे मानधन, बाल संस्थांसाठीचे अनुदान वितरण आदींबाबत आढावा घेतला. यावेळी सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त डॉ.ऋषिकेश यशोद, एकात्मिक बालविकास योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो व्हिडिओ कॉन्फरन्सवर उपस्थित होत्या.


            कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही अंशी अडचणी उद्भवल्या होत्या. भारतीय अन्नधान्य महामंडळामार्फत पोषण आहारांअंतर्गतचे धान्य उपलब्ध झाले होते. तथापि, लॉकडाऊनमुळे हे धान्य वाहनात भरण्यासाठी कामगार उपलब्ध नसणे तसेच धान्याच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता.


            ॲड. ठाकूर यांनी सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून पोषण आहाराच्या धान्याची उचल तसेच वाहतूक त्वरीत होईल या अनुषंगाने निर्देश दिले. त्यानुसार धान्य उपलब्ध होण्याची कार्यवाही सुरू झाली असून सर्व जिल्ह्यात हे धान्य पोहोचले आहे. एप्रिल तसेच मे 2020 साठी गर्भवती माता, स्तनदा माता तसेच 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांसाठीचा घरपोच पोषण आहार (टेक होम रेशन-टीएचआर) वितरीत करण्यात आला असून 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठीचा घरपोच पोषण आहार (टीएचआर) दि. 20 एप्रिल 2020 पूर्वी वितरीत केला जाईल याची खात्री करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.


            अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन तसेच बाल संस्थांसाठीच्या अनुदान वितरणाबाबतही शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे, असेही मंत्री ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या.